सभांसाठी नव्हे; खेळासाठीच गांधी ‘मैदान’
By admin | Published: July 19, 2016 12:35 AM2016-07-19T00:35:57+5:302016-07-19T00:53:00+5:30
पावणेदोन कोटींचा विकास आराखडा : उद्याच्या महापालिका सभेत होणार सादर; पॅव्हेलियन, धावपट्टी, पार्किंगची सोय
कोल्हापूर : गांधी मैदान म्हटले की, खेळ कमी अन् राजकीय टोलेबाजी, फटकेबाजी असलेल्या सभा यांचीच आठवण कोल्हापूरकरांना अधिक होते. कारण गेल्या काही वर्षांत या मैदानाचा वापर खेळापेक्षा राजकीय सभा, प्रदर्शन, प्रवचन, पार्किंग, आदी कारणांसाठीच झाला आहे. परंतु, आता मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच व्हावा, याकरिता महापालिका प्रशासनाने एक कोटी ७१ लाखांचा मैदान नूतनीकरणाचा प्रस्ताव उद्या, बुधवारच्या महासभेपुढे ठेवला आहे. यात अद्ययावत प्रेक्षक गॅलरी, धावपट्टी, अत्याधुनिक व्यायाम साहित्य, मैदानाचे सपाटीकरण, आदींचा समावेश आहे.
गांधी मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदींच्या सभाच नागरिकांना आठवतात. मात्र, येथे पूर्वी झालेल्या फुटबॉल लढती किंवा अन्य मैदानी स्पर्धा कोणालाही आठवत नाहीत.
गेले कित्येक वर्षे स्पर्धा राहू देत निदान खेळाचा सराव करण्यासाठी एक चांगले मैदान असावे, अशी मागणी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, आदी परिसरातील खेळाडूंची आहे. हीच बाब ओळखून काही लोकप्रतिनिधींनी या मैदानाचे अस्तित्व केवळ खेळासाठीच रहावे म्हणून आंदोलनही केले होते. आता या मागणीला महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखविण्याचे धाडस केले आहे. येत्या काही दिवसांत या मैदानाचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एक कोटी ७१ लाखांचा प्रस्ताव तयार केला असून, हा प्रस्ताव उद्या होणाऱ्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
तीन टप्प्यांत नूतनीकरण
नूतनीकरण तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अत्याधुनिक व्यायामशाळा, पॅव्हेलियन स्टेजवर जी.आय.चे छप्पर घातले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात मैदानाचे सपाटीकरण, माती भराव टाकणे, महाराष्ट्र हायस्कूलकडील पूर्वेकडील बाजूस प्रेक्षक गॅलरी, पॅव्हेलियनपासून बलभीम बँकेच्या पाठीमागील ओढ्यापर्यंत दोन मीटर रुंदीचा रबर मॅट असलेल्या फ्लोअरिंग ट्रॅक केला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात तिवले गॅरेजकडील कट्टे, पायऱ्या आहेत, त्या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी मोठे तीन टप्पे असलेला पॅसेज केला जाणार आहे.
शिवाजी पेठ, मंगळवार पेठांमधील फुटबॉल, हॉकी, जिम्नॅशियम, मैदानी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना गांधी मैदानाचा मोठा आधार आहे. मात्र, या मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मैदानावर खेळाडू कमी होत आहेत. महापालिकेने नूतनीकरण केले तर खेळाडूंची उत्तम सोय होईल.
- सुहास साळोखे, फुटबॉल प्रशिक्षक
२०१४ च्या शालेय व क्रीडा खात्याच्या आदेशात मैदानाच्या नूतनीकरणाच्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार या मैदानाच्या नूतनीकरणाचा एक कोटी ७१ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव महासभेपुढे मांडून मंजुरी घेतली जाणार आहे. मंजुरीनंतर तीन टप्प्यांत नूतनीकरण केले जाणार आहे. - रमेश मस्कर, उपशहर अभियंता
महापालिका उद्याने, मैदाने दत्तक देणार
कोल्हापूर : शहरातील खेळाची मैदाने, बगीचा, खुल्या जागा केवळ महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या विकसित करता येत नाहीत म्हणून या जागा खासगी प्रायोजक शोधून त्यांना दत्तक तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केला
आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीकरिता ठेवला आहे.
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कोल्हापूर महानगरपालिका स्वत:च्या मालकीची मैदाने, बगीचा, तसेच खुल्या जागा विकसित करू शकत नाही. जकात, एलबीटीसारखे प्रमुख उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्यानंतर तर प्रत्येक कामास शासकीय निधीवर अबलंबून राहावे लागत आहे. रस्ते, गटारी, चॅनेल, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी टाकणे, अशा अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिल्यामुळे मैदाने, बगीचा यांची दैनंदिन देखभाल करणेही महानगरपालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे गांधी मैदान, दुधाळी मैदान, शास्त्रीनगर मैदान भकास बनली आहेत; तर अनेक बगीचांची अवस्था दयनीय झाली आहे. काही बागीचांमध्ये तर केवळ पाणी उपसा करण्यासाठी मोटारी, पाईप नसल्याने वृक्ष जगविणे, हिरवळ वाढविणे जमत नाही.
शहराच्या विविध भागात अंतिम लेआऊट मंजूर करताना वेगवेगळ्या कारणांसाठी खुल्या जागा सोडण्यात आलेल्या आहेत. या सर्व खुल्या जागा मनपाच्या ताब्यात आहेत; पण त्या-त्या कारणासाठी विकसित करणे शक्य झालेले नाही. ( पान ६ वर)