झाडे लावण्याचे नव्हे, जगविण्याचे आव्हान
By admin | Published: June 30, 2017 01:15 AM2017-06-30T01:15:40+5:302017-06-30T01:15:40+5:30
मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील : कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात २९ लाख झाडे लावणार
चार कोटी वृक्षलागवडीच्या जंगी मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अगदी आज, शुक्रवारपासून ते ७ जुलैपर्यंत महाराष्ट्रभर वृक्षलागवडीचा कृतिजागर सुरू राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र ३३ टक्के वनाच्छादित करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली आहे. नागरिकांनाही या मोहिमेचे महत्त्व पटले असून तेदेखील आता या मोहिमेमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांंचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद...
झाडे लावण्याचे नव्हे, जगविण्याचे आव्हान
मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील : कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात २९ लाख झाडे लावणार
प्रश्न : या मोहिमेची गरज का वाटते?
उत्तर : बदलत्या परिस्थितीत विविध कारणांनी वृक्षतोड वाढली. वाढत्या नागरिकीकरणामुळे औद्योगिकरण वाढले. शहरांचे आकार वाढले. यामुळे वनाच्छादित क्षेत्र कमी झाले. परिणामी ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा मोठा धोका निर्माण झाला. वातावरणात विचित्र बदल होऊ लागले. पावसाच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळेच झाडे लावण्याची गरज निर्माण झाली. मुळात महाराष्ट्रात १९ टक्के वनजमीन आहे. आता या जमिनीवर ३३ टक्के झाडे लावणे शक्य नाही. त्यामुळेच मग उर्वरित जमिनीवर समाज आणि संस्था यांच्या सहकार्याने वृक्षलागवड करून त्या आधारे पर्यावरण संतुलित ठेवण्यात आपला हातभार असावा, यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रश्न : ५० कोटी वृक्षलागवड ही मोहीम नेमकी कशी राबविली जात आहे?
उत्तर : २०१६ साली राज्यभर २ कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात २ कोटी ८३ लाख झाडे लावण्यात आली. यंदा राज्यभरात ४ कोटी, पुढील वर्षी १३ कोटी आणि २०१९ साली ३३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने ठेवले आहे. अशा पद्धतीने चार वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचे नियोजन करणयात आले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत यंदा २९ लाख ६१ झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील वर्षी ८० लाख आणि २०१९ साली २ कोटी ९५ लाख ९ हजार झाडे या पाच जिल्ह्यांत लावण्यात येणार आहेत.
प्रश्न - ही प्रक्रिया नेमकी कशी आहे?
उत्तर - ही प्रक्रिया गेले दोन महिने सुरू आहे; कारण यासाठी आधी खड्डे काढण्याचे नियोजन करावे लागते. वन खाते तर गेल्या वर्षीपासूनच रोपनिर्मितीच्या कामात आहे; कारण सर्वांना रोपे पुरविण्याची जबाबदारी वनखात्यावर आहे. कुठे खड्डे काढले जाणार आहे, याची माहिती आॅनलाईन भरणे आवश्यक आहे. जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून काढलेल्या खड्ड्यांची खातरजमा करता येते.
प्रश्न - रोपांची उपलब्धता कशी करून देत आहात?
उत्तर - रोपे पुरविण्याची जबाबदारी वनखात्याकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ३६४ झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना रोपे ही मोफत दिली जाणार असून, ती गावात पोहोच केली जाणार आहेत. सध्या ही रोपे वितरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र स्वयंसेवी संस्था, शासनाचे अन्य विभाग, नागरिक यांना रोपे विकत घ्यावी लागणार आहेत. पाच जिल्ह्यांत ५० रोपे विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आले असून, नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, गडहिंग्लज आणि इचलकरंजी येथे स्टॉलवरून रोपविक्री सुरू आहे. पाचही जिल्ह्यांंंंंंंत १ कोटी १८ लाख रोपे तयार करण्यात आली असून, पुढच्या वर्षीसाठीही रोपे तयार करून ठेवली जात आहेत.
प्रश्न - वृक्षलागवड करताना कोणत्या वृक्षांना प्राधान्य द्यावे?
उत्तर - परदेशी झाडे लावू नयेत. आपटा, आंबा, आवळा, बांबू, चिंच, गुलमोहर, हिरडा, काजू, कांचन, करंज, काशिद, खैर, कोकम, सुरू, रेन-ट्री, शिसम, सिल्व्हर, जांभूळ, लिंब, ऐन या झाडांना प्राधान्य द्यावे; कारण आपल्या परिसरात हीच झाले चांगल्या पद्धतीने वाढतात. निलगिरी, आॅस्ट्रेलियन सुबाभूळसारखी झाडे आता लावू नयेत.
प्रश्न - झाडे जगविण्याबाबत काय दक्षता घेतली जाते?
उत्तर - वनखात्याच्या वतीने जी झाडे लावली जातात, ती अधिकाधिक कशी जगतील याची काळजी आम्ही घेतो. आमचा तो कर्तव्याचा भाग आहे. मात्र, ग्रामपंचायती, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्याकडून जी झाडे लावली जातात, ती जगविण्याचे खरे आव्हान आहे; कारण अतिशय उत्साहाने ही सर्व मंडळी वृक्षारोपणामध्ये सहभागी होतात; परंतु पावसाळा संपल्यानंतर या झाडांची देखभाल नीट होत नाही. त्यांना पाणी घालणे, जनावरे खाण्यापासून त्यांचा बचाव करणे यासाठी देखभाल गरजेची आहे. पहिली तीन-चार वर्षे या झाडांची काळजी घेतली की मग काही अडचण येत नाही. मात्र, झाडे लावण्यातील उत्साह टिकवून ते झाड जगवून मोठे करणे हेच आव्हानात्मक आहे.
प्रश्न- झाडे मोठी करताना कोणत्या अडचणी येतात?
उत्तर- वणवा हे आमच्यासमोर फार मोठे आव्हान आहे. या पाचही जिल्ह्यांत चांगले पाऊसमान आहे. त्यामुळे झाडे जगण्याचे प्रमाण अधिक आहे. वनखात्याच्या वतीने लावलेली ८५ टक्क्यांपेक्षा झाडे चांगल्या पद्धतीने जगली आहेत. मात्र ग्रामपंचायतींनी लावलेली झाडे ७० टक्क्यांपर्यंत जगली आहेत. गावागावांत लावलेली झाडे जगविण्याची गरज आहे. अनेकदा शेतकरी शेतातला पाला जाळण्यासाठी गवत, पाला पेटवतात. वाऱ्यामुळे आग पसरते आणि अनेक झाडांचा त्यात बळी जातो. त्यामुळे गावसभांच्या माध्यमातून वणव्यांबाबत जनजागरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आखली आहे. यामध्ये नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,
असे आवाहनही मी यानिमित्ताने करीत आहे.
- समीर देशपांडे