नको ‘थर्टी’; वाहतुकीचे नियम ‘फर्स्ट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:18 AM2017-12-30T01:18:15+5:302017-12-30T01:18:15+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजची तपासणी, ‘ड्रंक अॅँड ड्राईव्ह’ करून गोंगाट करणाºयांवर शुक्रवारी रात्रीपासून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशी-विदेशी मद्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाईची मोहीम आखली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
पोलीस अधीक्षक मोहिते यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील अधिकाºयांची विशेष बैठक घेतली. ‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत जात असतात. अशावेळी अपघात होऊन दुर्घटना घडतात. त्याचबरोबर काही हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रा व डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करीत असताना महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊन जल्लोषाला गालबोट लागू शकते. शहरातील वाहतूक व्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना हॉटेल व रिसॉर्ट मालकांना द्या, पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी करा, शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागांतील गावठी हातभट्ट्यांवर कारवाई करा, शुक्रवार रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून ‘ड्रंक अॅँड ड्राईव्ह’विरुद्ध मोहीम राबवा. जेणेकरून मद्यप्राशन करून कोणीही वाहन चालविण्याचे धाडस करणार नाही, अशा सूचना दिल्याचे मोहिते यांनी सांगितले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडी विभागाचे आर. आर. पाटील, करवीरचे सूरज गुरव यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली
नववर्षाच्या स्वागतानिमित्त उद्या, रविवारी नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेण्यासाठी महापालिकेची उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने प्रसिद्धिपत्रकातून ही माहिती देण्यात आली. रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे उद्यान, शेळके उद्यान, पद्मावती उद्यान, मंगेशकर उद्यान, नेहरू बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, दादासाहेब शिर्के उद्यान, महावीर उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क उद्यान, लालबहादूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक उद्यान, रुईकर ओपन उद्यान, सम्राटनगर उद्यान, टेंबलाई उद्यान, श्रीराम उद्यान, हुतात्मा पार्क उद्यान ही उद्याने खुली राहणार आहेत.
दरोड्याचा गुन्हा दाखल करा : चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, लूटमारीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा. जेणेकरून पुन्हा असे गुन्हे करण्याचे धाडस होणार नाही, अशा सूचना मोहिते यांनी अधिकाºयांना दिल्या.
पोलिसांच्या शर्टवर ‘बटण स्पाय कॅमेरा’
शहरात वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाºया वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याचा डाव संबंधितांच्या अंगलट येणार आहे. पोलिसांना ड्युटीवर असताना बटण स्पाय कॅमेरा दिला आहे. त्यामुळे सर्व चित्रीकरण या कॅमेºयात टिपले जाणार आहे. हा पुरावा ग्राह्य मानून गुन्हा दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षभरात अनेक वाहतूक पोलिसांवर हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर हा बटण स्पाय कॅमेरा दिला आहे. शर्टच्या बटणाच्या आकाराचा असलेला कॅमेरा समोरील सर्व दृश्य टिपतो. तसेच तो लावल्याचे पुढच्याला समजत देखील नाही.