पर्यटनस्थळ नाही, तर पराक्रमाची भूमी

By admin | Published: July 23, 2014 11:10 PM2014-07-23T23:10:14+5:302014-07-23T23:16:09+5:30

संजय घाटगे : हसन मुश्रीफ यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Not a tourist, but a land of fortune | पर्यटनस्थळ नाही, तर पराक्रमाची भूमी

पर्यटनस्थळ नाही, तर पराक्रमाची भूमी

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह कौलगे-कडगाव व उत्तूर जि. प. मतदारसंघ माझ्या मतदारसंघात आहेत. लोकांच्या संपर्कासाठी गडहिंग्लजला छोटेसे घर भाड्याने घेतले आहे. गडहिंग्लज हे पर्यटनस्थळ नाही, तर शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची भूमी आहे. त्या पराक्रमी वीरांचा वारसा सांगणाऱ्या जनसामान्यांना भेटण्यासाठीच गडहिंग्लजला जातो, असे प्रत्युत्तर माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.
चार दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे पत्रकारांशी बोलताना जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी घाटगे हे पर्यटनासाठी गडहिंग्लजला येतात, असा टोला हाणला होता. त्यास घाटगेंनी आज, बुधवारी गडहिंग्लजमध्येच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
घाटगे म्हणाले, गडहिंग्लज कारखाना चालू ठेवण्याची मुश्रीफांची भूमिका ही शेतकऱ्यांच्या कळवळीचे सोंग आहे. कारखान्यासाठी मदतच करायची होती, तर श्रीपतराव शिंदे, राजकुमार हत्तरकी व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये फूट पाडण्याचे काम त्यांनी करायला नको होते. सर्व नेत्यांना एकत्र ठेवूनही शेतकऱ्यांना मदत करता आली असती. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सत्ता व पैशाच्या जोरावर त्यांनी केलेला हा एक डाव आहे.
विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंहराजे व आपली युती अभेद्य राहील, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्याबद्दल छेडले असता घाटगे म्हणाले, माझा राजकीय जन्म विक्रमसिंहराजे यांच्यामुळेच झाला. राजे राजकारणात अग्रेसर राहावेत म्हणून ३० वर्षे रात्रीचा दिवस करून मी त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो आहे. याउलट त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न करून मुश्रीफ यांनीच त्यांचे खूप नुकसान केले आहे. आता आपल्या राजकीय फायद्यासाठी ते राजेंवर प्रेम दाखवत आहेत.
शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक व महाडिक यांना मुश्रीफांनी सोडले नाही. त्यामुळे संधी मिळताच ते राजेंवरही वार करायला मागेपुढे बघणार नाहीत, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
‘शिवसेनेतर्फे’च लढणार
विधानसभा निवडणूक कुठल्या पक्षातर्फे लढवणार, याविषयी पत्रकारांनी छेडले असता घाटगे यांनी, सदाशिवराव मंडलिक व संजय मंडलिक हेच आपल्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, जाता-जाता ‘शिवसेनेतर्फे’च लढणार, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

Web Title: Not a tourist, but a land of fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.