नांगनूरमध्ये लक्षवेधी महिला बसथांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:18 PM2019-03-13T23:18:17+5:302019-03-13T23:19:37+5:30
नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील स्मार्ट ग्रामपंचायतीने २०१८-१९च्या ग्राम निधीतून लक्षवेधी महिला बसथांबा बांधला आहे. गावच्या प्रवेशद्वाराच्या वळणावरती हा बसथांबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हलकर्णी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील स्मार्ट ग्रामपंचायतीने २०१८-१९च्या ग्राम निधीतून लक्षवेधी महिला बसथांबा बांधला आहे. गावच्या प्रवेशद्वाराच्या वळणावरती हा बसथांबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनेक गावांमध्ये बसथांब्याची पडझड झाली आहे. फरशा चोरीस गेल्या असून, बैठक व्यवस्था मोडून पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. अगर एखाद्या घराच्या वळचणीचा आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर नांगनूरच्या ग्रामपंचायतीने तयार केलेला हा खास महिला बसथांबा कौतुकाचा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.
प्रवेश करताच नजरेत भरतात ते दोन स्वच्छ भारताचे लोगो. बैठक व्यवस्थेच्या वरील बाजूस आकर्षक डिजीटल फलकावरती घोषवाक्यातून रेखाटली आहे ती प्रबोधनात्मक चित्रावली. प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे. मग, मुलगी का नको? ‘लेक वाचवा..भविष्य घडवा...’, ‘मुलगा-मुलगी भेद नको’, ‘मुलगी झाली खेद नको’, ‘निरोगी शरीर हाच खरा दागिना’, ‘पर्यावरण वाचवा..भविष्य घडवा..’ , ‘पृथ्वी आपले घर आहे’, ‘पृथ्वी वाचवा..जीवन वाचवा’, ‘पाणी म्हणजे जीवन’, ‘आवरा वेगाला.. सावरा जीवाला’, ‘पाण्याविना जीवन नाही,’ आदी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व संस्काराची घोषवाक्ये लक्ष वेधून घेत आहेत. शिवबा, जिजाऊंच्या चित्रातून देशाला हवेत शिवबा, जिजाऊ म्हणून स्रियांना सन्मानाने वागवू, असा संदेश देण्यात आला आहे.