जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:07 PM2020-01-29T13:07:31+5:302020-01-29T13:08:38+5:30
पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर : पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, भूजल सर्वेक्षणचे ऋषिकेश गोसकी हे यावेळी उपस्थित होते.
आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्वच गावांच्या पिण्याच्या पाण्याची उद्भवस्थाने तपासली जातात. पाण्याचे शुद्धिकरण, उद्भवस्थानांची स्वच्छता, गळती या सर्वांची पाहणी करण्यात येते. यानंतर या ग्रामपंचायतींसाठी लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाते.
या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्भवस्थानांनजीक अस्वच्छता, गळती असल्याचे निदर्शनास आले होते. अशा गावांना पिवळे कार्ड देण्यात आले होते. यातील आजरा, गवसे, इटे, चाफवडे, चितळे (ता. आजरा), कोदाळी, वाघोत्रे (ता. चंदगड),कातळी (ता. गगनबावडा), चिखली, बेलेवाडी काळम्मा, बेलवळे खुर्द (ता. कागल) आणि यवलूज (ता. पन्हाळा) या १२ ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या सुधारणा केल्याने त्यांना पुन्हा हिरवे कार्ड देण्यात आले.
मात्र उर्वरित ४८ ग्रामपंचायतींनी काय सुधारणा केल्या, काय उपाययोजना केली याची माहितीच जिल्हा परिषदेकडे न दिल्याने अखेर या सर्व ग्रामपंचायतींना नोटिसा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामपंचायतींना सुधारणा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.