कोरोना माहिती न दिल्याबद्दल २० लॅबना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:19+5:302021-05-30T04:20:19+5:30
कोल्हापूर : कोरोनाकाळातील विविध चाचण्यांचे अहवाल व त्यांची माहिती आवश्यक नमुन्याप्रमाणे एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प विभागास सादर न केल्याबद्दल ...
कोल्हापूर : कोरोनाकाळातील विविध चाचण्यांचे अहवाल व त्यांची माहिती आवश्यक नमुन्याप्रमाणे एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प विभागास सादर न केल्याबद्दल जिल्ह्यातील व बाहेरील अशा २० लॅबना शनिवारी नोटिसा बजावल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या नोटीस काढल्या असून, पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही अहवाल पाठवला आहे. २५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत आयसीएमआर पोर्टलवरील कोविड-१९ आरटीपीआरसीआरचे १८७७ आणि रॅटचे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात या लॅबनी नीट माहिती न भरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११ व जिल्ह्याबाहेरील ९ लॅबचा समावेश आहे.
लॅब अशा : रॅट (रॅपिड ॲंटिजन टेस्ट) अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ), केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथालॉजी (इचलकरंजी), जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल, श्रीसाई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब, पार्थ लॅब, देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी, मृण्मयी लॅब, हेल्थ व्ह्यू. आरटीपीआरसीआर अंतर्गंत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे), डॉ. लाल पॅथालॉजी (विमाननगर - पुणे), मेट्रो पोलीस हेल्थ केअर (मुंबई), प्रिव्हेंटिन लाईफ केअर (नवी मुंबई), थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. (नवी मुंबई), इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे), यूडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ (पुणे) येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या लॅबनी त्यांच्याकडील कोविड रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहित नमुन्यात सादर केला नाही. त्यामुळे कोविड निर्देशांकामध्ये तफावत आल्यामुळे या नोटिसा देण्यात आल्या.
चौकट
रुग्णसंख्येवर ठरतो इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा
पोटर्लवर रुग्णसंख्या किती आहे, त्यावरून एखादा जिल्ह्याला किती रेमडेसिविर इंजेक्शन्स, ऑक्सिजन पुरवठा करायचा याचाही विचार केला जातो. तसेच, आकडेवारीतील तफावतीमुळे धोरण ठरवतानाही गोंधळ होत असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.