गटनेत्यांसह चौघांना नोटीस

By admin | Published: April 23, 2016 01:18 AM2016-04-23T01:18:08+5:302016-04-23T01:40:00+5:30

शिवसेनेतील वाद : पक्षशिस्तीचे बाळकडू देणार - दुधवडकर

Notice to all four with group leaders | गटनेत्यांसह चौघांना नोटीस

गटनेत्यांसह चौघांना नोटीस

Next

गटनेत्यांसह चौघांना नोटीस
शिवसेनेतील वाद : पक्षशिस्तीचे बाळकडू देणार - दुधवडकर


कोल्हापूर : शिवसेनेचे चारही नगरसेवक नवीन आहेत, त्यांना पक्षशिस्त काय असते हे अजून माहीत नाही म्हणूनच त्यांना पक्षशिस्तीचे बाळकडू देणार आहोत, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी येथे सांगितले. दरम्यान, पक्षाच्या अधिकृत भूमिके ला छेद देऊन महानगरपालिका प्रभाग समिती निवडणुकीत विरोधाची भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांना शिवसेनेने शुक्रवारी ‘कारणे दाखवा नोटीस’ दिली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी दुधवडकर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणातून गटनेता नियाज खान यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीची घटना तसेच गेल्या दोन दिवसांपासून उमटलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवक, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून माहिती घेतली.
नियाज खान यांचे चुलते साजिद मेस्त्री तसेच मामा सलिम सय्यद यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर जाऊन दुधवडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. नियाज राजकारणात नवीन आहे. महापालिकेतील कामकाजाचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांच्या हातून नकळत चूक झाली आहे म्हणून त्यास माफ करून सांभाळून घ्यावे, अशी विनंती दोघांनी दूधवडकरांना केली.
दरम्यान, दुधवडकर यांनी दुपारपर्यंत नियाज खान, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. नगरसेवक राहुल चव्हाण मात्र त्यांना भेटले नव्हते. मात्र, त्यांनी एका लग्नाला गेलो असल्याचा निरोप दिला होता. दुपारी दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चारही नगरसेवकांना बाळकडू देण्याची आवश्यकता आहे. पक्षात नवीन आहेत. त्यांना पक्षशिस्त काय असते हे माहीत नाही. त्यामुळे त्यांना पक्षशिस्तीचे बाळकडू द्यावे लागणार आहे. पक्षाचा आदेश न पाळता उलटी भूमिका घेतलेल्या नगरसेवकांना पक्षातर्फे ‘कारणे दाखवा नोटीस’ देण्यात आली आहे, त्यांचा खुलासा आल्यावर कारवाई केली जाईल, असे दुधवडकर यांनी सांगितले.
खान यांच्या घरावरील दगडफेकीचे समर्थन करता का? असे विचारले असता दुधवडकर म्हणाले की, दगडफेकीचे समर्थन करता येणार नाही; परंतु शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. (प्रतिनिधी)

 

शिवसेना नगरसेवक तटस्थच
शिवसेना नगरसेवक सभागृहातील कामकाजात तटस्थच बसतील. भाजपने मनपा निवडणुकीत आमच्याशी युती केली नव्हती. त्यावेळी भाजपने निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. त्यांना शिवसेनेची गरज नव्हती. निवडणुकीनंतर भाजपने परिवहन समिती सभापतिपद देऊ केले होते. मात्र, आता आम्हाला भाजपची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थच राहतील, कोणाच्याच बाजूला ते असणार नाहीत, असे दूधवडकर यांनी स्पष्ट केले.

प्रसंगी पोलिस फिर्यादी होणार
शहरात जर कोण सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात पोलिस प्रशासन कडक भूमिका घेईल व प्रसंगी त्यात स्वत: पोलिस फिर्यादी होतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी सांगितले. वाय. पी. पोवार नगर येथील शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांच्या घरावर गुरुवारी (दि. २१) हल्ला झाला. या प्रकरणी शुक्रवारी कसबा बावडा येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.

कोल्हापूर महानगरपालिका राजकारणात भाजप व ताराराणी आघाडीला पाठिंबा देण्यावरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या शिवसेना नगरसेवकांना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्षशिस्तीचे धडे शिकविल्यानंतर नियाज खान, आ. राजेश क्षीरसागर, मंत्री दिवाकर रावते, जिल्हाप्रमुख संजय पवार, राहुल चव्हाण, महेश उत्तुरे हे सर्व शुक्रवारी एका कार्यक्रमात एकत्र आले.

Web Title: Notice to all four with group leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.