मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पुरवण्याच्या बँकांना सूचना
By admin | Published: October 2, 2015 01:12 AM2015-10-02T01:12:30+5:302015-10-02T01:13:15+5:30
प्रांताधिकारी कार्यालयात निर्णय : नागरिकांशीही सौजन्याने वागण्याचे आमदारांची व्यवस्थापकांना विनंती
इचलकरंजी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांनी सुलभरित्या कर्ज वाटप करावे. त्याचबरोबर नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व बॅँकांच्या व्यवस्थापकांना केल्या. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व शिखर बॅँकेचे सरव्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत शिशू योजना, किशोर योजना व तरुण योजना या माध्यमांतून लघुउद्योजकांना कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. येथील भाजपच्यावतीने याबाबत जनजागृती केली असून, त्यानुसार सर्व बॅँकांमध्ये व्यवसायासाठी कर्ज काढण्यासाठी तरुण जातात. मात्र, तेथे व्यवस्थित माहिती दिली जात नाही. तसेच कर्जपुरवठाही केला जात नाही, अशा अनेक तक्रारी आमदार हाळवणकरांकडे आल्या. त्यानुसार या कर्ज पुरवठ्यामध्ये बॅँकांना कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे व कर्जपुरवठा सुरळीत करणे यासाठी गुरूवारी ही बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पुढील महिन्यात या योजनेसाठी इचलकरंजीत विशेष मोहीम म्हणून कर्ज पुरवठा करण्यासाठी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही स्पष्ट केले.
यावेळी मुद्रा योजनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विनोद कांकाणी, भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, आदींसह शहर परिसरातील सर्व नॅशनल बॅकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. (वार्ताहर)
बॅँकांना बंधनकारक
सर्व बॅँकांना ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज साठ टक्के, पाच लाखापर्यंतचे वीस टक्के व दहा लाखापर्यंतचे वीस टक्के कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. संपूर्ण देशात या योजनेसाठी सरकारने १२२ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र, आजतागायत फक्त २५ हजार कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. बॅँकांच्या उदासिनतेमुळेच हे घडले आहे.
काम लागणार असल्याने उदासीनता
इचलकरंजीत प्रांत कार्यालयात गुरूवारी झालेल्या बैठकीमध्येही येथील बॅँकांचे सर्व प्रतिनिधी उदासीनतेच्या अवस्थेत दिसत होते. प्रांताधिकारी जिरंगे व आमदार हाळवणकर यांनी सूचना दिल्या. मात्र, त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद न देता आता पुन्हा नवीन काम लागणार, अशा उदासिनतेच्या भूमिकेत अधिकारी दिसले.