रविकिरण इंगवलेस हद्दपारीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:37+5:302021-06-05T04:19:37+5:30

कोल्हापूर : भडक वक्तव्ये करणे, पालकमंत्र्यांसह अन्य लोकप्रतिनिधींवर जहाल टीका करणे शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांना ...

Notice of deportation of Ravi Kiran Ingwale | रविकिरण इंगवलेस हद्दपारीची नोटीस

रविकिरण इंगवलेस हद्दपारीची नोटीस

Next

कोल्हापूर : भडक वक्तव्ये करणे, पालकमंत्र्यांसह अन्य लोकप्रतिनिधींवर जहाल टीका करणे शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांना चांगलेच भोवणार असे दिसते. इंगवले यांना कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी बजावली आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय करवीर विभाग यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर हद्दपार कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. इंगवले यांना बजावलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, इंगवले यांनी गर्दी, मारामारी करणे, ठार मारणे, जबर दुखापत करणे, नुकसान करणे, शिवीगाळ, दमदाटी, हत्यार बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी आदेश न मानणे, सरकारी नोकरांवर हल्ला, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला अटक होऊनही वर्तनात सुधारणा झालेली नाही, तुमच्या गुन्हेगारी कारवाईमुळे समाजात दहशत निर्माण होऊन लोकांच्या जिवाला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी तुमच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनही गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.

याप्रकरणी शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, मंगळवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता योग्य व लायक जामीनदारासह हजर राहावे, असेही नोटिसीत बजावण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरप्रमुख इंगवले यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर सातत्याने जहाल टीका करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. त्याचे काही परिणाम या नोटिसीच्या माध्यमातून उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Notice of deportation of Ravi Kiran Ingwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.