‘पार्किंग’वर डल्ला मारणाऱ्यांना नोटीस
By admin | Published: April 5, 2016 11:55 PM2016-04-05T23:55:18+5:302016-04-06T00:17:51+5:30
आयुक्तांची कारवाई : शहरात फिरुन पाहणी केल्यावर अधिकारी धारेवर; दुकानगाळेही सील
कोल्हापूर : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापारी संकुलांतील पार्किंगच्या जागांचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याची बाब मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निदर्शनास आली. सोमवारी (दि. ४) अचानक तीन ठिकाणी फिरती करून पार्किंगच्या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी होतो याची पाहणी केली, त्यावेळी हे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली. संबंधित तीन मिळकतधारकांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरात अचानक फिरती सुरू केली. त्यांनी राजारामपुरी येथील दोशी यांची मिळकत (जय हिंद), भानुदास रायबागे यांची मिळकत (एस प्लाझा), तसेच ताराबाई पार्क येथील राहुल देसाई यांच्या मिळकतीची (गोल्ड जिम इमारत) पाहणी केली असता, या इमारतीमधील पार्किंगचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याचे दिसून आले. याबाबत आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश सहायक संचालक (नगररचना) धनंजय खोत यांना दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाकडून संबंधित मिळकतधारकांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून, दंडाची आकारणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यावेळी आयुक्तांनी केलेल्या फिरतीवेळी राजारामपुरी येथील काही इमारतींमधील दुकानगाळे भोगवटा न घेताच वापर सुरू केल्याचे निदर्शनास आले. हे दुकानगाळे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने परवाना विभागामार्फत सील करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी वर्गात, तसेच विनापरवाना व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडकी भरली आहे.
शहरातील ज्या इमारतधारकांनी पार्किंग बंदिस्त अथवा पार्किंगचा वापर इतर कारणासाठी केला आहे, त्यांनी स्वत:हून असे अतिक्रमण काढून टाकावे; अन्यथा महापालिकेकडून अतिक्रमण काढून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आयुक्तांच्या फिरतीवेळी सहायक संचालक (नगररचना) धनंजय खोत, कनिष्ठ अभियंता हेमंत जाधव, पद्मल पाटील, परवाना अधीक्षक सचिन जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पार्किंगची जागा व्यवसायासाठी
शहरातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत व्यवसाय सुरू आहेत. काही ठिकाणी गोदामे आहेत. त्यामुळे अशा इमारतींसमोर रस्त्यावर वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळा वर्तमानपत्रांतून त्याबाबत बातम्या छापून आल्या आहेत. तरीही विभागीय कार्यालयातील अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पार्किंगच्या जागा बंदिस्त झाल्या आहेत. आयुक्तांनी यापुढे शहरात सर्वत्र पाहणी केल्यास त्यांना आणखी अनेक इमारतींमधील अतिक्रमण दिसून येईल. त्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.