४०० व्यापाऱ्यांना महापालिकेच्या नोटिसा, एलबीटी कर निर्धारण करण्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:50 PM2019-06-22T16:50:30+5:302019-06-22T16:53:31+5:30
एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून (एलबीटी) असेसमेंट पूर्ण करण्यात आलेल्या व्यापारी, फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरीही काही व्यापारी, फर्म यांनी कराची रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
अभय योजनेत सहभागी एकूण २२१२ व्यापारी, फर्म पैकी १८१२ व्यापाऱ्यांनी कर निर्धारण पूर्ण केले आहे. उर्वरित ४०० व इतर व्यापाऱ्यांना अभय योजना लागू होत नसलेल्या महानगरपालिकेतर्फे करनिर्धारण पूर्व नोटीस पाठविण्यात येत आहेत.
राज्य शासनाच्या दि.३ जून २०१५ च्या परिपत्रकाप्रमाणे अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. सदर योजनेमध्ये काही व्यापाऱ्यांनी नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व कराचा योग्य भरणा केलेला नाही अशा व्यापाऱ्यांना व फर्मना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत.
याबाबत स्थानिक संस्था कर विभागाकडून व्यापारी, फर्म यांना योग्य निर्णयशक्तीनुसार करनिर्धारण करून सुनावणीस उपस्थित राहणेबाबत नोटीस पाठविल्या जात आहेत. कागदपत्रे सादर करण्याबाबत विभागाकडून वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
तथापि, संबंधित व्यापाऱ्यांनी समाधानकारक प्रतिसाद न दिल्यामुळे पुन्हा अशा व्यापारी, फर्म यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी एलबीटी असेसमेंट करून घेतलेले नाही त्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे स्थानिक संस्थाकर विभागाकडे त्वरित जमा करून कराची रक्कम भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.