खराब रस्तेप्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटिसा
By admin | Published: July 19, 2016 12:37 AM2016-07-19T00:37:34+5:302016-07-19T00:52:38+5:30
महापालिकेची कारवाई : चार दिवसांत रस्ते न केल्यास फौजदारी
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करणाऱ्या नऊ प्रमुख ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी नोटीस लागू केली. पावसामुळे चार दिवसांत उखडलेले रस्ते नव्याने करून द्या; अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराच या नोटिसीद्वारे देण्यात आल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
९ ते १२ जुलै दरम्यान शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात गेल्या वर्षभरात करण्यात आलेले ५९ रस्ते खराब झाले. अनेक ठिकाणच्या बाजूपट्ट्या वाहून गेल्या, तर काही रस्त्यांचा वरचा थर धुऊन गेला. दायित्व कालावधीतच रस्ते निकृष्ट झाल्यामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनास धारेवर धरले. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, आदींनी चारही विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तसेच जे रस्ते खराब झाले आहेत, त्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही आदेश दिले होते.
शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांत झालेल्या सर्वेक्षणात शहरातील ५९ रस्ते खराब झाल्याचे आढळून आले. त्याची जबाबदारी ठेकेदारांवर निश्चित करण्यात आली. सुमारे १४ कोटींचा निधी या कामांवर खर्च करण्यात आला होता. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल महानगरपालिकेने सोमवारी ठेकेदार अनिल पाटील, बबन पोवार, उत्तम पाटील, महेश भोसले, अमित साळोखे, अनंत कन्ट्रक्शनचे दिलीप काजवे, संगीता कन्ट्रक्शनचे गणेश खाडे, शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे कुकरेजा यांना नोटीस लागू केली.
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. कामे निकृष्ट केल्याबद्दल ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली नव्हती. मात्र, महापौर रामाणे तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे नोटीस लागू झाली. (प्रतिनिधी)