बार असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांना नोटीस
By admin | Published: April 23, 2015 01:05 AM2015-04-23T01:05:48+5:302015-04-23T01:06:01+5:30
सर्किट बेंचप्रश्नी आंदोलन : टायर पेटविल्याची हरित लवादाकडून दाखल
कोल्हापूर : सर्किट बेंचप्रश्नी केलेल्या आंदोलनात टायर पेटविल्याप्रकरणी येथील कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे, सचिव राजेंद्र मंडलिक यांना २३ एप्रिलला लवादासमोर हजर राहून म्हणणे मांडण्याची नोटीस पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर, तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी दिली आहे.
बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्किट बेंचसाठी येथे अनेक दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे. १३ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीवर कोल्हापूरसह पाच जिल्ह्णांतील वकिलांनी बहिष्कार टाकला. त्या दिवशीच्या आंदोलनात लोकन्यायालयाच्या नोटिसांची पक्षकारांनी होळी करून बहिष्कार दर्शविला.
आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करून न्यायालयीन कामकाज बंद पाडले होते. टायर पेटविण्यात आले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अध्यक्ष घाटगे, सचिव मंडलिक, उपाध्यक्ष के. व्ही. पाटील आदी वकिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतले होते.
यासंबंधी बातम्या वृत्तपत्रांमध्ये छायाचित्रांसह प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावरून परिसर संरक्षण संवर्धन संस्था यांचे प्रमुख प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ, निवृत्त आयपीएस अधिकारी सी. जी. कुंभार यांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांच्याकडे टायर पेटवून प्रदूषण केल्याची तक्रार केली. यावरून डोके यांनी यासंबंधी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे तक्रारदारांना कळविले.
दरम्यान, पुणे विभागाच्या राष्ट्रीय हरित लवादच्या निदर्शनास ही बाब आली. न्यायमूर्ती किनगावकर, डॉ. देशपांडे यांनी २७ फेब्रुवारीला उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष घाटगे, सचिव मंडलिक यांना नोटीस काढून २३ एप्रिलला पुणे लवादासमोर हजर राहून म्हणणे मांडावे. घटना घडली किंवा कसे, लवादाच्या आदेशाचा भंग का केला याबाबत प्रतिज्ञापत्र मागितले आहे. (प्रतिनिधी)
आंदोलनामध्ये सहभागी घेतलेल्या सर्व वकील, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावरील कोणत्याही कारवाईची जबाबदारी जिल्हा बार असोसिएशनने स्वीकारली आहे. लवादाने दिलेल्या नोटिसीनंतर कोणताही आदेश, शिक्षा समाजासाठी आणि सर्किट बेंचसाठी आम्ही भोगण्यास तयार आहोत.
- अॅड. विवेक घाटगे, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन