महापालिका, जनता बझारला ‘मुद्रांक’ची नोटीस
By Admin | Published: March 27, 2015 12:17 AM2015-03-27T00:17:11+5:302015-03-27T00:21:57+5:30
मुद्रांक शुल्क चुकवेगिरी : अधिकाऱ्यांची कारवाई; मंगळवारी होणार सुनावणी
कोल्हापूर : महापालिकेकडून जनता बझार व्यवस्थापनाने राजारामपुरीतील मिळकतीचा पुनर्करार करताना खुली जागा दाखवून ९० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडाविल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई व बुरहान नाईकवडी यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी उदयराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार चव्हाण यांनी महापालिका व जनता बझार व्यवस्थापनाला नोटिसीद्वारे या प्रकरणी मंगळवार (दि. ३१)पर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राजारामपुरीतील सि.स.नं. १२१६ ही २७१९.३३ चौरस मीटरची मिळकत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप कंझ्युमर्स लिमिटेड यांनी महापालिकेडून ३० वर्षे भाडेकराराने घेतली आहे. दरम्यान, यापूर्वी ही जागा १९८२ मध्ये जनता बझारने भाडेपट्टीवर घेऊन ती विकसित केली होती. मात्र, भाडेकरार (दस्त क्रमांक ६७१९/२०१४)नुसार खुल्या जागेची रेडिरेकनरप्रमाणे ४ कोटी ७१ लाख रुपये किमत दाखवून ११ लाख ८० हजार मुद्रांक शुल्क भरले. मात्र, प्रत्यक्षात या जागेची व्यापारी संकुलानुसार किंमत २२ कोटी ५० लाख रुपये होते. त्यानुसार ५ टक्के मुद्रांक शुल्क असे एकू ण १ कोटी रुपये होतात. मात्र, प्रत्यक्षात ९० लाख रुपये मुद्रांक संगनमताने बुडविला. मुद्रांक कार्यालयात दस्तासाठी भाडे करआकारणी तक्ता (असेसेमेंट उतारा) न जोडताच करार कसा? केला अशी तक्रार देसाई यांनी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे केली होती.
यानुसार महापालिकेचे तत्कालीन इस्टेट अधिकारी संजय भोसले व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप कंझ्युमर्स स्टोअर्सचे अध्यक्ष उदय पोवार यांना नोटीस बजावली आहे. मंगळवारी सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह दुपारी ३-३० वाजता हजर राहण्याचे आदेश उदयराज चव्हाण यांनी दिले आहेत. नोटिसीमुळे मनपात वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वाटणीसाठी...
प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी, जनता बझारच्या रुईकर कॉलनी, शिवाजी पेठ व राजारामपुरी येथील मिळकतींचा भाडेकरार करताना या तिन्ही ठिकाणी मुद्रांक शुल्क विभागाचे करवीर क्रमांक १ चे सह. दुय्यम निबंधक वर्ग २ अधिकारी एस. पी. लादेच कसे? असा आक्षेप घेतला. तसेच करार करताना करार करणाऱ्या व्यक्तीचा फोटो एकच व नावे वेगवेगळी आहेत, त्याचीही नोंद घ्यावी. शिवाजी पेठ व रुईकर कॉलनी येथील जनता बझारच्या मिळकतींचा करार करताना दोन्हींचा असेसमेंट उतारा जोडला आहे. मात्र, राजारामपुरी येथील करार करताना फक्त रिकाम्या जागेचा असेसमेंट उतारा जोडला आहे. तेथील बांधकामाचा उतारा जोडला नसल्याने तब्बल ९० लाख रुपये मुद्रांक शुल्क बुडाले आहे. हे पैसे आपापसांत वाटून घेण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला आहे. यामध्ये दस्तावर लिहून देणार व घेणार यांच्याबरोबरच आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही चौकशीची मागणी केली.