जिल्हा बँकेच्या तिघांना नोटीस
By admin | Published: January 26, 2017 12:54 AM2017-01-26T00:54:08+5:302017-01-26T00:54:08+5:30
आंधळा कारभार भोवला : ४ लाखांचे ४० लाख करण्याचे प्रकरण
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील तीन कर्मचाऱ्यांना बँक प्रशासनाने बुधवारी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. जिल्हा परिषदेचे ठेकेदार खोत यांनी चार लाखांचा धनादेश भरला असताना त्यांच्या खात्यावर ४० लाख रुपये वर्ग करण्याचे प्रकरण या कर्मचाऱ्यांना अंगलट आले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार विशाल खोत यांना ४ जानेवारीला ४ लाख ४ हजार २१५ रुपयांचा धनादेश दिला होता. त्यांनी हा धनादेश त्यांचे खाते असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेत भरला. तो क्लिअरिंगसाठी जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत आला. या शाखेतून चार लाखांऐवजी ४० लाख ४२ हजार २१५ रुपये संबंधित ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मूळ रकमेपेक्षा खोत यांच्या खात्यावर ३६ लाख ३७ हजार ८०० रुपये जादा जमा झाले. जिल्हा परिषदेने बँकेतून पासबुक भरून आणल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आणि प्रशासनाची पळापळ सुरू झाली. त्यांनी बँकेच्या शाखेत चौकशी केली असता नजरचुकीने जादा रक्कम वर्ग झाल्याचे सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बँक प्रशासनाने एक पथक जिल्हा परिषद शाखेत पाठविले. त्यांनी चौकशी करून सोमवारी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर बुधवारी शाखाधिकारी विद्या कुलकर्णी, लिपिक विजय अस्वले व ब्रँच अकौंटंट शब्बीर उस्ताद यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
३६ लाख जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा
जादा वर्ग केलेले तब्बल ३६ लाख रुपये बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने जिल्हा परिषदेसह जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. याबाबत २२ जानेवारीला ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
त्यानंतर रविवारी विशाल खोत यांच्याशी संपर्क साधून त्यांना जादा रक्कम तुमच्याकडे आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जादा आलेले हे पैसे त्यांनी लवकर भरावेत यासाठी पाठपुरावा सुरू झाला. त्यांनी दोन टप्प्यात पैसे भरत बुधवारी संपूर्ण जादा आलेले पैसे भरून टाकले.
जिल्हा परिषद शाखेत घडलेल्या घटना गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये शाखाधिकारी, लिपिक, ब्रँच अकौंटट दोषी आढळले असून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
-प्रतापसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)