Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस
By समीर देशपांडे | Published: March 26, 2024 11:50 AM2024-03-26T11:50:19+5:302024-03-26T11:50:58+5:30
गटविकास अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना
समीर देशपांडे
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्याप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी सात पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिले आहे.
नदीप्रदूषणाबाबत १२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सुनावणी झाली होती. यावेळी यानंतरच्या होणाऱ्या सुनावणीमध्ये पंचगंगा नदी खोऱ्यातील ग्रामपंचायतींनी नदी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेने हा अहवाल मागवला आहे. पंचगंगा नदी ही तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि धामणी या पाच नद्यांपासून बनली आहे. या नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू असून, केवळ बैठका, आराखडे यातच खूप कालावधी निघून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेने केवळ कोल्हापूर शहर आणि पुढच्या गावांना जबाबदार न धरता पंचगंगेच्या खोऱ्यातील म्हणजे संगमाआधीच्या पाचही नद्या आणि पंचगंगेच्या काठावरील अशा एकूण १८१ गावांना जबाबदार धरले आहे. त्यामुळेच गगनबावडा, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ या सात तालुक्यांतील ज्या ग्रामपंचायतींनी गावातील सांडपाणी, कचरा नदीत जाऊ नये यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यांना या नोटीस काढण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेची चार पत्रे
अशा पद्धतीने गावातील सांडपाणी, मैलायुक्त पाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी चार महिन्यांत चार पत्रे काढली होती. त्याची आता ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी केली की नाही, याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
गावातील हॉटेल, मंगल कार्यालय, यात्री निवास, सर्व्हिसिंग सेंटरमधून बाहेर पडणारे पाणी याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, यासाठीही ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने मार्गदर्शन केले होते. परंतु, अनेक ग्रामपंचायतींनी या पत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. आता किती ग्रामपंचायतींनी पंचगंगा प्रदूषण निर्मूलन करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले हे आता स्पष्ट होणार आहे.