Kolhapur- ए. एस. ट्रेडर्स प्रकरण; निरीक्षक स्वाती गायकवाड यांना तपासात त्रुटींबद्दल नोटीस

By उद्धव गोडसे | Published: February 14, 2024 01:11 PM2024-02-14T13:11:21+5:302024-02-14T13:11:48+5:30

तीन वर्षांसाठी वेतनवाढ का रोखू नये?, खुलासा करण्याचा आदेश

Notice to Investigating Officer Police Inspector Swati Gaikwad regarding the lapses in the investigation of fraud committed by A. S. Traders Company | Kolhapur- ए. एस. ट्रेडर्स प्रकरण; निरीक्षक स्वाती गायकवाड यांना तपासात त्रुटींबद्दल नोटीस

Kolhapur- ए. एस. ट्रेडर्स प्रकरण; निरीक्षक स्वाती गायकवाड यांना तपासात त्रुटींबद्दल नोटीस

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडून त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गायकवाड यांना नोटीस पाठवली असून, तीन वर्षांसाठी वेतनवाढ का रोखू नये? अशी विचारणा केली आहे. याबाबत योग्य खुलासा करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

ए. एस. ट्रेडर्स कंपनीवरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला होता. तपास अधिकारी औदुंबर पाटील, स्वाती गायकवाड यांनी तपास केला. निरीक्षक गायकवाड यांनी तपासात त्रुटी ठेवून संशयित आरोपींना मदत केल्याचा आरोप ए. एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केला होता. याची गंभीर दखल घेऊन अधीक्षक महेंद्र पंडित यांनी निरीक्षक गायकवाड यांची चौकशी लावली होती. 

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी निरीक्षक गायकवाड यांच्या तपासाची चौकशी करून अहवाल अधीक्षक पंडित यांच्याकडे सोपवला. पंडित यांनी तो अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयजी फुलारी यांनी निरीक्षक स्वाती गायकवाड यांना नोटीस बजावली आहे. तपासात त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवून, तीन वेतनवाढ रद्द का करू नयेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

गायकवाड यांच्याकडूनच मुख्य सूत्रधाराला अटक

तत्कालीन तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनीच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याला अटक केली होती. यासह अन्य काही महत्त्वाच्या संशयितांना अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे काम त्यांनी केले होते. सूत्रधार लोहितसिंग याच्या अटकेनंतर त्याच्याकडून अपेक्षित मुद्देमाल जप्त झाला नाही. तसेच एका संशयितासोबत हॉटेलमध्ये बैठक घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर होता.

अन्य अधिकाऱ्यांचेही काम संशयास्पद

शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश गवळी आणि तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी तपासात गती घेतली नाही. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग झाल्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याही कार्यशैलीबद्दल फिर्यादींच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त होत आहे.
 

Web Title: Notice to Investigating Officer Police Inspector Swati Gaikwad regarding the lapses in the investigation of fraud committed by A. S. Traders Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.