पंचगंगा प्रदूषण कारणास्तव कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटीस
By समीर देशपांडे | Published: May 16, 2024 04:02 PM2024-05-16T16:02:28+5:302024-05-16T16:03:01+5:30
सांडपाणी थेट नदीत मिसळते त्या ठिकाणी भेटी देवून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्याच्या आधारेच या नोटीसा काढण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरूवारी कारवाई का करण्यात येवू नये अशा नोटीसा काढल्या आहेत. १४ मे रोजी संयुक्त पाहणीमध्ये पंचगंगा नदीत या दोन्ही महापालिकेसह या सात ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निष्पन्न झाले होते.
पंचगंगा प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली होती. कोल्हापूर, इचलकरंजीसह करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ज्या ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळते त्या ठिकाणी भेटी देवून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्याच्या आधारेच या नोटीसा काढण्यात आल्या आहेत.