कामचुकारांना नोटिसा - अतिरिक्त आयुक्तांची झाडाझडती :
By admin | Published: July 23, 2014 12:16 AM2014-07-23T00:16:17+5:302014-07-23T00:33:37+5:30
एलबीटी विभागातील १५ कर्मचारी गायब
कोल्हापूर : महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागातील तब्बल १५ कर्मचारी गैरहजर असल्याचे आज मंगळवारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी केलेल्या झाडाझडतीमध्ये आढळून आले. या सर्व कामचुकार कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. सबळ उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे सचिन चव्हाण यांनी
स्पष्ट केले.
महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचारी कामचुकारपणा करतात. वेळेवर कार्यालयात येत नाहीत, दुपारी जेवणाच्या सुटीअगोदर तासभर व सुटीनंतर तासभर गायब असतात, अशा अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे आल्या होत्या. अशा तक्रारींवर उपाय म्हणून आयुक्त कार्यालय सर्व विभागाशी सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याने जोडण्यात आले. कार्यालयातील सर्व घटनांच्या तपशीलाची नोंद होऊ लागली. आयुक्तांची नजर आहे म्हटल्यावर कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी दिसू लागली.
मात्र, सी.सी.टीव्ही ‘वॉच’वरही कर्मचाऱ्यांनी रामबाण उपाय शोधल्याची माहिती सचिन चव्हाण यांना लागली. कॅमेऱ्याच्या कक्षेपुरतेच कर्मचारी गर्दी करतात. इतर कार्यालय रिकामेच असते. कॅमेऱ्याची व्याप्ती जाणून काही बहाद्दरांनी आपल्या टेबलाची रचनाही बदलली. ही बाब सचिन चव्हाण यांना समजताच, त्यांनी अतिरिक्त आयुक्त देसाई यांना एकत्र पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या.
आज दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास चव्हाण व देसाई यांनी आयुक्त कार्यालयातून एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांची स्थिती जाणून घेतली.
कॅमेऱ्यातील चित्रीकरणानुसार कार्यालयात कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या दिसत होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत कार्यालय रिकामेच होते. १५हून अधिक कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.