जिल्ह्यातील २३९ बोगस डॉक्टरांना नोटिसा
By admin | Published: May 18, 2017 12:17 AM2017-05-18T00:17:43+5:302017-05-18T00:17:43+5:30
कारवाईमुळे खळबळ : शोध समितीमार्फत तालुकावार संशयित डॉक्टरांच्या पदव्यांची तपासणी करणार
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात येत असून, एकूण २३९ जणांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून तालुकावार या डॉक्टरांच्या पदव्या तपासण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील ८ डॉक्टरांच्याविरोधात याप्रकरणी ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एल. पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी संयुक्त बैठका घेऊन कारवाईची ही मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संशयित १२२ बोगस डॉक्टरांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे इलेक्ट्रो होमिओपॅथी असलेल्या ११७ जणांनाही नोटिसा काढण्यात आल्या आहेत. ही पदवी धारण करणाऱ्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी लावता येत नाही. तसेच दवाखान्याचा फलक लावून व्यवसाय करता येत नाही, तरीही अनेक जण ‘डॉक्टर’ पदवी लावून फलक लावून व्यवसाय करीत आहेत म्हणून या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या नोटिसा काढल्यानंतर आता तालुका बोगस डॉक्टर शोध समितीमार्फत दवाखाने तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आठजणांवर सात गुन्हे दाखल
आतापर्यंत जिल्ह्यातील आठ बोगस डॉक्टरांविरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लक्ष्मण वारके (रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) हे भुदरगड तालुक्यातील निळपण येथे व्यवसाय करत होते. नारायण कुंभार (रा. कपिलेश्वर ता. राधानगरी) हे कोनोली येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. करवीर तालुक्यातील चिंचवाड रेल्वे फाटकाशेजारी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अरुणा कावले आणि तामगाव (ता. करवीर) येथील कृष्णा दामुगडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच पिंटू रोडे (रा. पिराचीवाडी ता. कागल), पांडुरंग पवार (रा. घोसरवाड ता. शिरोळ) तसेच कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्वागत तोडकर (रा. जुनी वाशी नाका), कोमल पाटील (मंगळवार पेठ) अशा एकूण आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहीम अधिक तीव्र करणार
स्त्री भू्रणहत्या रोखण्याचा एक भाग म्हणून बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक कठोर करणे आवश्यक आहे. याआधी अनेकवेळा अशा डॉक्टरांविरोधात कारवाई करताना अनेक त्रुटी राहात होत्या; परंतु याबाबतचीही दक्षता घेण्यात आली असून सर्व संबंधित घटकांना याबाबत तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोल्हापूरसारख्या सधन, संपन्न जिल्ह्यातील मुलींचे कमी प्रमाण असणे हे वेदनादायी आहे म्हणूनच ही संयुक्त कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल.
- डॉ. कुणाल खेमनार,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर