कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या बड्या थकबाकीदारांना लिलावाच्या नोटिसा, नावे झळकणार होर्डिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:01 PM2018-08-17T14:01:55+5:302018-08-17T14:05:06+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच्या प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच्या प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या २३ जुलैला झालेल्या औद्योगिक समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर बँक प्रशासनाने थकबाकीदार संस्थांच्या बाबतीत ठोस पावले उचलली आहेत.
३१ मार्च २०१८ अखेर थकबाकीदार असलेल्या या संस्थांमध्ये शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, राधानगरी तालुका सहकारी मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था मर्यादित (ठिकपुर्ली), विजयमाला बाबूराव देसाई सहकारी वाहतूक संस्था मर्यादित (मडीलगे बुद्रुक), शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्यादित (हेरवाड), भोगावती शेतकरी सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्यादित (परिते), हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्यादित (निलजी), महाराष्ट्र स्टेट को-आॅप. टोबॅको फेडरेशन(मार्केट यार्ड), मयूर सहकारी वाहतूक संघ मर्यादित (कोल्हापूर), पंत सहकारी वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था लिमिटेड (तिळवणी), श्री. एस. के. पाटील सहकारी बँक लिमिटेड (कुरुंदवाड) या बड्या थकबाकीदार संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती या देण्यात आली आहे.
थकबाकीदारांची नावे झळकणार होर्डिंगवर
या कारवाईचा पहिला टप्पा म्हणून बँकेतर्फे या बडया थकबाकीदार संस्थांची नावे व थकीत रकमेसह याद्यांचे होर्डिंग्ज बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर, तसेच थकबाकीदार संस्थांसह संचालकांच्या दारात लावले जाणार आहेत.
तसेच यासंबंधीचे निवेदनही वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध केले जाणार आहे. या मानहानीला बँक जबाबदार असणार नाही. बँकेने यापूर्वी राबविलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेत (ओटीएस) सहभाग घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी कळवूनही प्रतिसाद न मिळाल्याने या नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
थकबाकी भरा अन कटू प्रसंग टाळा
अजूनही वेळ गेलेली नाही. थकबाकी सत्वर भरून कटू प्रसंग टाळावा. संस्थेच्या वसुलीबाबत ‘ओटीएस’ योजना चालू असून, त्याचा लाभ घ्यावा. तरीही दोन आठवड्यात आपणाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यास अतिशय नाईलाजास्तव लिलाव प्रक्रियेची कठोर पावले उचलावी लागतील, असा निर्वाणीचा इशारा बॅँक प्रशासनाने नोटिसीद्वारे दिला आहे.