फेरतपासणी न करणाऱ्या बसमालकांना नोटिसा
By admin | Published: June 16, 2016 11:30 PM2016-06-16T23:30:29+5:302016-06-17T00:30:44+5:30
‘आरटीओ’ची कारवाई : शाळा बस वाहतूक प्रश्न; न आल्यास परवाना रद्द करणार
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्कूल बसेसची फेरतपासणी मुदतीत न केलेल्या कोल्हापुरातील २८२ बस परवानाधारकांना गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘आपला परवाना रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजावल्या. सात दिवसांत नोटिसीला उत्तर न दिल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
उच्च न्यायालयात स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता जनहित याचिका दाखल झाली होती. यात स्कूल बसची सुटीच्या कालावधीत फेरतपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने परिवहन आयुक्तांना दिले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्कूल बस परवानाधारकांना आपल्या बस फेरतपासणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात आणाव्यात म्हणून वैयक्तिक नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यात दोनवेळा तपासणीकरिता मुदतवाढ देऊनही अनेक परवानाधारकांनी याकडे कानाडोळा केला. बुधवारी (दि. १५) संपलेल्या दुसऱ्या मुदतीत ५०७ पैकी २२५ परवानाधारकांनी बसेसची फेरतपासणी केली. यात किरकोळ दुरुस्ती व सूचना करीत या बसेस तपासणीत उत्तीर्णही करण्यात आल्या; पण उर्वरित २८२ परवानाधारकांनी या तपासणीला ठेंगा दाखविला. इचलकरंजी येथे दोन वेळेस, तर गडहिंग्लज व कोल्हापूर कार्यालयात रविवारी सुटीच्या दिवशीही विशेष शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर विषय असूनही या बस परवानाधारकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने प्रथम शिक्षणाधिकारी व त्यानंतर शिक्षण उपसंचालकांद्वारे त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंतीपत्रेही पाठविली. त्यानुसार २२५ जणांनी आपल्या बस तपासून घेतल्या. उर्वरित बस परवानाधारकांनी पाठ फिरविली. म्हणून फेरतपासणी न केलेल्या परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
विद्यार्थी वाहतुकीचा गंभीर प्रश्न असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरतपासणी करणे ही स्कूल बस परवानाधारकांसाठी आवश्यक बाब होती. ज्यांनी तपासणी केली नाही, अशा परवानाधारकांना नोटीस बजावण्यात येईल. तरीही ते तपासणीकरिता आले नाहीत तर त्यांचा परवाना निलंबित केला जाईल.
- रमेशचंद्र खराडे,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर