प्रदूषणास कारणीभूत कोल्हापुरातील २४ उद्योगांना नोटीसा, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:05 PM2024-08-20T13:05:39+5:302024-08-20T13:06:16+5:30
कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या ...
कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित अशा तीन मोठ्या एमआयडीसी आहेत. या एमआयडीसींमध्ये विविध स्वरूपात प्रदूषण करणाऱ्या २४ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित एमआयडीसींमध्ये उद्योगांची संख्या जास्त आहे. या तिन्ही एमआयडीसी परिसरात उपनगरांचीही संख्या मोठी असल्याने कंपन्यांमधून प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. या एमआयडीसींमध्ये फौंड्री उद्योगांसह विविध उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे प्रदूषण होणार नाही याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार सूचना दिल्या जातात.
मात्र, काही कंपन्या या सूचनांचे पालन करत नसल्याने महामंडळाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या सात महिन्यांत २४ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तीन एमआयडीसींमधील ४ कंपन्यांना निर्देश दिले आहेत. तर ३ कंपन्यांना अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रदूषण करणाऱ्या ५ कंपन्यांसाठी प्रस्तावित आदेशही काढण्यात आले आहेत.
दरम्यान, औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार विविध उपक्रम राबविले जातात. कंपन्यांमध्ये जनजागृती केली जाते. तरीही काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नोटीस, पुढे काय?
प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ज्या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे अशा कंपन्यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी काय खुलासा केला आहे यावरून त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरविले जाते.