पंचगंगा प्रदूषण: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:18 PM2024-05-17T12:18:35+5:302024-05-17T12:19:29+5:30

सात दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली

Notices to Kolhapur, Ichalkaranji Municipal Corporation and seven Gram Panchayats in the case of Panchganga pollution | पंचगंगा प्रदूषण: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटिसा

पंचगंगा प्रदूषण: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटिसा

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्याप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा बजावल्या. १४ मे रोजी संयुक्त पाहणीमध्ये पंचगंगा नदीत या दोन्ही महापालिकेसह या सात ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट नदीत मिसळत असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी या नोटिसा काढल्या असून, सात दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे.

पंचगंगा प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली होती. कोल्हापूर, इचलकरंजीसह करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ज्या ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळते त्या ठिकाणी भेटी देऊन पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्याच्या आधारेच जलप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ च्या कलम ३३ नुसार या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

याआधीही पंचगंगा प्रदूषणाबाबत सामाजिक संस्थांच्या रेट्यामुळे पंचनामे करण्यात आले आहेत. याआधीही महापालिका, ग्रामपंचायतींना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. हा फक्त ‘फार्स’ न होता प्रत्यक्षात काही ना काही कारवाई होण्याची गरज असून उपाययोजनांसाठी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा हा शासनाचा प्रश्न आहे. परंतु अशातच जिल्हा परिषदेने पाठवलेला २५२ कोटींचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेटाळल्याने आता पुन्हा नव्याने निधी उभारणीबाबत प्रयत्न करावे लागणार आहेत.

इचलकरंजीतून १८ दशलक्ष लिटर पाणी प्रक्रियेविना नदीत

इचलकरंजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून २० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त आणि १८ दशलक्षलिटर विनाप्रक्रिया सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे १४ मे रोजी स्पष्ट झाले आहे. वीज नसल्याने १३ मेच्या रात्रीपासून महापालिकेचा एसटीपी प्रकल्प बंद होता. इचलकरंजीच्या विविध भागांतून काळे आणि पिवळसर असलेले घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी पंचगंगेत मिसळते. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यापासून फेस असलेले पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा उल्लेख या नोटिसीमध्ये करण्यात आला आहे.

या ग्रामपंचायतींचा समावेश

नोटिसा काढण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये पाचगाव, कळंबा, उचगाव, चिंचवाड, गडमुडशिंगी, वळिवडे आणि गांधीनगर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातून विनाप्रक्रिया केलेले काळे सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प ग्रामपंचायतींनी बसवलेले नाहीत. तसेच या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कोणताही उपायही सुचवून त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा केलेली नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातून होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा ठपका या ग्रामपंचायतींवर ठेवण्यात आला आहे. याची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

कोल्हापूर महापालिकाही कारणीभूत

कचरायुक्त जयंती नाल्यातून सातत्याने काळे सांडपाणी पंचगंगेत मिसळते. खानविलकर पेट्राेल पंपाजवळून येणारा नाला, विश्वकर्मा सोसायटीच्या मागील बाजूने मिसळणारे सांडपाणी, सिद्धार्थनगरमधील सांडपाणी व सीपीआरच्या नाल्यातील सांडपाणी थेट नदीत विनाप्रक्रिया सोडले जाते. छत्रपती कॉलनीतील काळसर सांडपाणी असलेला कचरायुक्त नाला हा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीस मिसळत होता. ओव्हरफ्लो दुधाळी, ठिकठिकाणी साठलेले केंदाळ या सर्व बाबींचा उल्लेख कोल्हापूर महापालिकेला पाठवण्यात आलेल्या नोटिसीमध्ये करण्यात आला आहे.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ४० गावांतील विनाप्रक्रिया सांडपाणीही कारणीभूत ठरते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या गावची लोकसंख्या विचारात घेऊन त्या गावात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी कोणती उपाययोजना करायची यावर चर्चा सुरू आहे. या उपाययोजनेचा भार मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीवर पडू नये याचीही काळजी घेण्याची गरज आहे. लवकरच याबाबत निश्चित धोरण ठरवले जाईल. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Notices to Kolhapur, Ichalkaranji Municipal Corporation and seven Gram Panchayats in the case of Panchganga pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.