आता विंटेज वाहनांना नवीन नंबर, कोल्हापुरात एकूण 'इतकी' वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 03:48 PM2022-10-10T15:48:56+5:302022-10-10T15:49:25+5:30
अनेकांनी आजोबा-पणजोबांची आठवण, तर काहींनी हौस म्हणून अशी ७० ते ७५ वर्षांपूर्वीच विंटेज वाहने जपून ठेवली आहेत.
सचिन भोसले
कोल्हापूर : विंटेज कार तसा अमूल्य ठेवा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय होय. त्या इतके वर्षे जपून आणि सुस्थितीत ठेवणे तसे जिकिरीचे काम आहे. अनेकांनी आजोबा-पणजोबांची आठवण, तर काहींनी हौस म्हणून अशी ७० ते ७५ वर्षांपूर्वीच विंटेज वाहने जपून ठेवली आहेत. आता मात्र त्यांचे विंटेज असण्याची खूण असलेले त्या काळातील नंबर पडद्याआड जाऊन नवीन नंबर त्यांना मिळणार आहेत.
यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ नुसार अशा वाहनांची पुनर्नोंदणी आणि नवीन क्रमांक घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नवी ८ आकडी व्हीए सिरीज आणली आहे. या वाहनांची आरसी बुक जमा करून नवीन स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.
१९५० पूर्वीची सात विंटेज कार
कोल्हापूर शहरात १९५० पूर्वीची सात वाहने आहेत. त्यातील दोन वाहनांची नव्या नियमाप्रमाणे नोंदणी झाली आहे.
१९६० पूर्वीची १० क्लासिक कार
कोल्हापूर जिल्ह्यात १९६० पूर्वीची एकूण १० क्लासिक वर्गवारीतील वाहने उपलब्ध आहेत.
साठनंतरची वाहने -३
केवळ तीन विंटेज दुचाकी उपलब्ध
जिल्ह्यात सद्य:स्थितीत तीन विंटेज दुचाकी उपलब्ध आहेत. त्यातील ८ जून व २५ एप्रिल १९४९ आणि २० नोव्हेंबर १९४६ अशी या दोन दुचाकींची उत्पादन तारीख आहे.
- ६० वर्षांपूर्वीच्या क्लासिक दुचाकी संख्या - १७
- ६० नंतरच्या क्लासिक दुचाकी संख्या -९
नव्या नंबरला २० हजारांचा फटका
नव्या नियमाप्रमाणे ८ अंकी क्रमांकासाठी २० हजार पुनर्नोंदणीसाठी शुल्क आहे.
वेगळेपण दूर होणार
या कारचे एमटीसी, बीवायएन, एमएचके, एमएचएम, बीवायएच, एमएचव्ही-०००० असे क्रमांक होते. आता हे क्रमांक एमएचव्हीएएए ०००० असे वेगळे होणार आहेत.
अँटिक वाहन म्हणून आरटीओने वेगळे क्रमांक दिले. ही बाब स्वागतार्ह आहे. त्यामुळे जुन्या विंटेज कार म्हणून आजच्या जमान्यातही एक प्रकारे वेगळी ओळख कायम राहणार आहे. - विजय बुधले, उद्योजक व विंटेज कार मालक
केंद्र शासनाच्या नव्या नियमानुसार विंटेज वाहने जसजशी पुनर्नोंदणीसाठी येतील, त्याप्रमाणे ८ आकडी नवीन क्रमांक त्या वाहनांना दिला जात आहे. जेणेकरून त्याचे वेगळेपण जपले जाईल. - रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर