आता हॉटेल व संस्थांच्या कोविड केंद्रांमध्येही उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:08+5:302021-04-23T04:26:08+5:30
कोल्हापूर : जिलह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता जिल्हा प्रशासनाने रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांच्या नियंत्रणाखाली योग्य खासगी हॉटेल व ...
कोल्हापूर : जिलह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता जिल्हा प्रशासनाने रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांच्या नियंत्रणाखाली योग्य खासगी हॉटेल व स्वयंसेवी संस्थांच्या कोविड केअर केंद्रांना परवानगी दिली आहे. सध्या शासकीय व खासगी रुग्णांलयामध्ये बेड मिळत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांवर त्या- त्या तालुक्यातील कोविड काळजी केंद्र, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. या रुग्णालयांमधील सगळे बेड आता पूर्ण क्षमतेने वापरले जात आहेत. भविष्यात बेडची संख्या कमी पडू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानुसार खासगी रुग्णालये सर्व सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यास तयार असतील, तर त्यांना त्यांच्या जबाबदारीवर येथे उपचार सुरू करता येतील. मात्र, याबाबत त्यांच्यात करार करण्यात यावा. तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडूनही कोविड केअर केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आल्यास, त्यांच्याकडील वैद्यकीय सोयी- सुविधांची पाहणी करून त्यांना परवानगी देण्यात यावी. हॉटेलमधील उपचार व संस्थांच्या केंद्रातील रुग्ण व्यवस्थाही संस्थेच्या जबाबदारीवर असेल. याबाबतचे सनियंत्रण तालुकास्तरीय समितीमार्फत करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
--
साखर कारखाने व उद्योगामधील ऑक्सिजन रुग्णांसाठी
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व इतर उद्योगामधील ऑक्सिजन सिलिंडरचा वापर रुग्णांवरील उपचारासाठी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पुढील काळात रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व इतर उद्योग-कारखान्यांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलिंडर संख्या व त्याचा तपशील तातडीने एकत्रित करून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका यांना द्यावा. प्रशासनाच्या मागणीप्रमाणे हे ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात यावेत, असे पत्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, सहकारी संस्थांना पाठवण्यात आले आहेत.
--