रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

By admin | Published: March 5, 2015 12:22 AM2015-03-05T00:22:46+5:302015-03-05T00:25:26+5:30

‘बायोमेट्रिक’साठी यंत्रणा कामाला : खाबुगिरी होणार बंद, पारदर्शकता येणार

Now the arcs of black marketing in the ration system | रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

रेशन व्यवस्थेतील काळ्याबाजाराला आता चाप

Next

कोल्हापूर : शासनाने रेशन दुकानात बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेमधील काळ्याबाजाराला चाप बसणार आहे. लाभार्थ्याच्या नावावरील धान्यावर दरमहा डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही खाबुगिरी बंद होणार आहे. बायोमेट्रिक बसविण्यासाठी जिल्हा अन्नधान्य वितरण प्रशासन कामाला लागले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात १५६९ रेशन दुकाने आहेत. शासनाकडून दरमहा येणाऱ्या धान्याचे या दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाते. अंत्योदय योजनेतून लाभार्थ्याला दरमहा २० किलो गहू दोन रुपये दराने, तर १५ किलो तांदूळ ३ रुपये दराने दिला जातो. प्राधान्य योजनेतून प्रत्येक व्यक्तीला पाच किलोंप्रमाणे ‘अंत्योदय’च्या दराने धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सर्वच लाभार्थी रेशनचे धान्य प्रत्येक महिन्याला घेऊन जात नाहीत. परिणामी धान्य शिल्लक राहते. संबंधित धान्य दुकानदार व्यवस्थेतील कर्मचारी,अधिकारी यांना हाताशी धरून कागदोपत्री धान्य घेऊन गेल्याचे दाखवितात. शिल्लक राहिलेले धान्य खुल्या बाजारात विकतात. राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाईही होत नाही. परिणामी अनेक वर्षांपासून गरीब, सर्वसामान्यांसाठी आलेल्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे जगजाहीर आहे. काही दुकानदारांनी तरी लाभार्थ्यांच्या गैरसोयीच्या वेळी दुकान सुरू ठेवून अधिकाधिक धान्य कसे शिल्लक राहील आणि आपल्याला डल्ला कसा मारता येईल यावरच लक्ष केंद्रित केलेले असते. कितीही प्रत्यत्न केले, अधून-मधून कारवाई झाली तरी पूर्णपणे काळ्याबाजाराला चाप बसविण्यात यश येत नव्हते. यामुळे शासनाने शेवटी छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर रेशन धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थीचे ‘थंब’ झाल्यानंतरच त्याला धान्य मिळणार आहे. दुकाननिहाय शिल्लक राहिलेल्या धान्याची माहिती नेमकेपणाने मिळणार आहे. त्यात पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)


तालुकानिहाय ‘प्राधान्य’ व कंसात ‘अंत्योदय’ लाभार्थी तालुनिहाय असे -
कोल्हापूर- २४९८८४ (३२५९), करवीर- ३५८६५५ (१९७१), पन्हाळा- १६२७०५(४६५२), हातकणंगले- २९१३९७ (४९९५) , इचलकरंजी - ११३४८६ (४४७०), शिरोळ- २४७०५३ (४६३८), कागल- १६८५६० (४२२४), शाहूवाडी - १२६४३३ (३४६५) गगनबावडा- १८९०२ (८८३), राधानगरी- १३२७८७ (३९६०), गडहिंग्लज- ११७७३१ (६३५०), आजरा- ७३४४३ (४००९), चंदगड- १०७९१८ (६०६९), भुदरगड- ९८८३९ (३५५७).


बायोमेट्रिकमुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. काळाबाजार थांबणार आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोर होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाचा बायोमेट्रिकचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- चंद्रकात यादव, ‘रेशन बचाव’चे नेते

दुकानांची संख्या अशी
सहकारी संस्था८३७
वैयक्तिक४५३
महिला बचत गट २१७
ग्रामपंचायत४७
माजी सैनिक५
पुरुष बचत गट१
अनुसूचित जाती१
इतर८

Web Title: Now the arcs of black marketing in the ration system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.