आबा-आप्पांनंतर आता भाऊंची मोर्चेबांधणी
By admin | Published: June 3, 2014 11:56 PM2014-06-03T23:56:45+5:302014-06-04T00:00:48+5:30
शाहूवाडीचे रणांगण : महायुतीच्या उमेदवारीसाठी चढाओढ
राजाराम लोंढे, कोल्हापूर पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी सत्यजित पाटील (आबा), भारत पाटील (आप्पा) यांनी पेरणी सुरू केली आहे. त्यात कॉँग्रेसचे अमरसिंह पाटील (भाऊ) यांनी चाचपणी सुरू केल्याने आगामी काळात या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होण्यासाठी या तिघांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. अमरसिंह पाटील यांचेही शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न आहेत. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाने आजपर्यंत संमिश्र कौल दिला आहे. या मतदारसंघात सध्या सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड, आमदार कोरे, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे गट कार्यरत आहेत. आमदार कोरे यांनी विकासकामांच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यजित पाटील यांनी ‘गोकुळ’ व पंचायत समिती, तर कर्णसिंह गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपर्क ठेवला आहे. मानसिंगराव गायकवाडही आता सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील सर्वच गट कॉँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठीशी राहिले होते. तरीही खासदार राजू शेट्टी यांनी एकाकी झुंज देत सर्व नेत्यांना चारीमुंड्या चीत केले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी आमदार कोरे यांच्यापासून फारकत घेत खासदार शेट्टी यांच्याबरोबरची सलगी वाढवली आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी पन्हाळा तालुक्यात महिला संघटन केले आहे. त्याचबरोबर कॉँग्रेसचे अमरसिंह पाटील यांनीही शड्डू ठोकला आहे. दरम्यान दोनवेळा पराभव झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी अगोदरच घेतला आहे. त्यामुळे कॉँग्रेसमधून कर्णसिंह गायकवाड यांच्याऐवजी जिल्हा परिषदेचे सदस्य योगीराज गायकवाड यांना प्रमोट केले जाऊ शकते. शेट्टी यांच्या ‘शब्दा’ला महत्त्व... अमरसिंह पाटील यांनीही काँग्रेसवर अन्याय केल्याची तोफ डागत सर्व पक्षांचे पर्याय खुले असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचाही प्रयत्न शिवसेनेच्या उमेदवारीसाठीच आहे. मात्र, खासदार शेट्टी कोणाच्या पारड्यात आपले माप टाकणार, यावरच महायुतीची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार, हे निश्चित आहे.