आता रोख-ठोक; माघार नाही!:मराठा समाजाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:40 AM2018-07-25T00:40:07+5:302018-07-25T00:40:13+5:30
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून, याला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. आज, बुधवारपासून जिल्ह्यातील गावे या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सकाळी दहा वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठाबांधव उपस्थित होते. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनस्थळी दसरा चौकात उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ असा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे, महाराणी ताराबाई, राजर्षी शाहू यांच्या प्रतिमा होत्या.
यावेळी दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, फत्तेसिंह सावंत, सचिन तोडकर, वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, शाहीर दिलीप सावंत, दीपा पाटील, राजू सावंत, उमेश पोवार, अॅड. गुलाबराव घोरपडे, जयेश कदम, राजू लिंग्रस, संदीप पाटील, स्वप्निल पार्टे, संजय पोवार-वाईकर, साक्षी पन्हाळकर, आदी सकल मराठा समाजाचे शिलेदार उपस्थित होते.
आंदोलनस्थळी शाहू छत्रपती, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख
प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, कोल्हापूूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, आदी मान्यवरांसह विविध पक्ष व संघटनांनी येऊन पाठिंबा दिला.
आंदोलनात माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, गणी आजरेकर, मुरलीधर जाधव, तौफिक मुलाणी, डॉ. संदीप नेजदार, सत्यजित कदम, स्वाती यवलुजे, सरिता मोरे, उमा बनछोडे, उद्योजक चंद्रकांत जाधव, किशोर घाटगे, बाबा पार्टे, प्रा. मधुकर पाटील, उदय लाड, चंद्रकांत बराले, उदय भोसले, अमर समर्थ, भरत रसाळे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. सुरेश कुराडे, आदिल फरास, अवधूत अपराध, मंदार पाटील, अभिजित राऊत, आदी सहभागी झाले होते.
शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा : सतेज पाटील
मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत आणि संयमाने आंदोलन केले; परंतु सरकारने दुर्लक्ष करून आरक्षणाच्याबाबतीत मागासवर्गीय आयोग व न्यायालयाकडे बोट दाखविण्याचे काम केले. कॉँग्रेसची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून आपण या आंदोलनात सक्रिय राहू. शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
चोख पोलीस बंदोबस्त
सकल मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात मंगळवारी झालेल्या आंदोलनावेळी शहरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला. इतर जिल्ह्यात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस निरीक्षक,
१८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व सुमारे २०० पोलिसांच्या फौजफाट्यासह राज्य राखीव पोलीस दलाची व राखीव बटालियनची प्रत्येकी एक अशा दोन तुकड्या कार्यरत होत्या.