वीज पडून मृत्यू पावलेल्यांचा वारसांना मिळणार आता केंद्रातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 07:26 PM2017-10-09T19:26:15+5:302017-10-09T19:37:13+5:30
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आता थेट केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. अशाप्रकारे वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश राज्य आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वारसांना मिळणारी ४ लाखांची मदत आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याबाबत महाराष्टÑ शासनाने निर्णय घेतला आहे.
प्रवीण देसाई
कोेल्हापूर : वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आता थेट केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. अशाप्रकारे वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश राज्य आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वारसांना मिळणारी ४ लाखांची मदत आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याबाबत महाराष्टÑ शासनाने निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात मान्सून कालावधीमध्ये मृत्युमुखी पडणाºया लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांशी लोक हे वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नसल्याने संबंधितांच्या वारसांना मदत देता येत नव्हती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीबाबत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या यादीत ज्या आपत्तींच्या यादीत समावेश नाही, परंतु राज्यांना त्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते त्या आपत्तीस ‘राज्य आपत्ती’ घोषित करावी. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार देय असलेली मदत आपत्तीग्रस्तांना तसेच मृतांच्या नातेवाईकांना देणे बांधील राहील, अशी शिफारस केली होती.
त्यानुसार वीज पडून होणाºया मृत्यूचा राज्य आपत्तीत समावेश करण्याची मान्यता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. ३१ मे २०१७ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून राज्य शासनाने या आपत्तीचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश केला आहे. दि. ४ आॅक्टोबरला तसा शासननिर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधितांच्या वारसांना थेट केंद्र सरकारकडूनच मदत मिळणार आहे.
सध्या वीज पडून मृत झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जात होती; परंतु या निर्णयामुळे ही मदत आता थेट केंद्र सरकारकडून संबंधितांच्या वारसांना मिळणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अशी मिळणार मदत
- वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये
- ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० रुपये
- ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास २ लाख रुपये
- एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी रुग्णालयात दाखल असल्यास ४ हजार ३०० रुपये
- एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० रुपये