आता ‘सीएचबी’धारकांचा एल्गार : एप्रिलअखेर डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:53 AM2018-04-08T00:53:43+5:302018-04-08T00:53:43+5:30
कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नेट, सेट आणि पीएच.डी. धारक मुंबईमध्ये धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणार आहेत.
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नेट, सेट आणि पीएच.डी. धारक मुंबईमध्ये धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे आंदोलन करण्याची तयारी नवप्राध्यापक पदभरती आंदोलन कृती समितीद्वारे सुरू आहे.
याबाबत आंदोलन कृती समितीचे समन्वयक संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले की, सरकारने सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीवर बंदी घातल्याने सीएचबीधारकांचे मोठे नुकसान होत आहे.
सरकारने पदभरती सुरू करावी, अन्यथा आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्यावी, अशी मागणी सीएचबीधारकांकडून होत आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री, आदींना पदभरती बंदी उठविण्याबाबत अनेक निवेदने दिली आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाही होणे अपेक्षित आहे. याबाबत एप्रिल अखेरपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. अन्यथा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सीएचबीधारक धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन भरतीबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.
बार्शी येथील उमेश शिंदे म्हणाले, उच्चशिक्षण घेऊन पीएच.डी.धारक, सेट-नेट उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना सी.एच.बी.धारक म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. आर्थिक स्थैर्य नसल्याने आणि भरती बंदी असल्याने एकप्रकारे या सी.एच.बी.धारकांची मानसिक आत्महत्या होत आहे. त्याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन भरतीची प्रक्रिया सुरू करावी.
कोल्हापूरचे मकरंद ऐतवडे यांनी सांगितले की, सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती त्वरित होणे आवश्यक आहे. सध्या एक-दोन महाविद्यालयांत सीएचबीवर काम करूनदेखील नेट-सेट, पीएचडीधारकांच्या हातात तुटपुंजे मानधन पडत आहे. भरतीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत या सीएचबीधारकांना एका महाविद्यालयासाठी निश्चिती करून २५ हजार वेतन द्यावे. (समाप्त)
आंदोलनस्थळी वडापाव, पकोडे विकणार
नांदेड येथील डॉ. परमेश्वर पोळ यांनी सांगितले की, भरती बंदी उठवावी. सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरावीत आणि नवीन पदे निर्माण करावीत, आदी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनस्थळी पात्रताधारक हे वडापाव, पकोडा विक्री स्टॉल लावणार आहेत. यासाठी राज्यातील पीएच.डी.धारक, नेट-सेट उत्तीर्ण पात्रताधारकांना संघटित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. '
नेट-सेट परीक्षांमधील उत्तीर्णतेची टक्केवारी वाढली आहे. सध्या टक्केवारी सहा इतकी आहे. सहायक प्राध्यापकपदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत दर सहा महिन्यांनी वाढ होत आहे. त्यातच भरतीबंदी असल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. भरतीवरील बंदी उठविणे आवश्यक आहे.
- अश्विनी पाटील, कोल्हापूर