रेल्वेने फाटक बंद केल्याने आता कोल्हापूरकरांचा नवा छुपा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:17 PM2017-11-30T13:17:19+5:302017-11-30T13:18:40+5:30
रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे.
कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी बंदी घातली तरी, पादचाऱ्यांनी मात्र नवा छुपा मार्ग शोधून काढून पुन्हा धोकादायक प्रवास सुरु केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल जरी उचलले असले तरी पादचाऱ्यांनीही हार न मानता रेल्वेच्या बंदीला झुगारुन धोकादायक मार्गक्रमण सुरुच ठेवले आहे.
रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर स्टेशन नजीकचा रेल्वे रूळ ओलांडण्यास गेल्या आठवड्यात लोकांना बंदी घातली. त्यामुळे राजरामपुरीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या असंख्य लोकांची गैरसोय झाली, मात्र तरीही लोकांनी हार न मानता पुन्हा या फाटकाजवळील १00 ते १५0 मीटर अंतरावर असलेला नवा धोकादायक मार्ग शोधून काढून तेथून ये-जा सुरु केली आहे.
या प्रकाराकडे अजूनतरी रेल्वे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने अजूनतरी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने पादचाऱ्यांना परिख पूलाखालून जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
रेल्वेचा सध्या अस्तित्वात असलेला परिख पूल धोकादायक बनला आहे, अरुंद रस्त्याममुळे तेथुनही जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. नवा पादचारी मार्ग बांधण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.
यामुळे या परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांचा प्रवास सुरिक्षत करण्याची जबाबदारी कोण घेणार, येथे नवा पूल केव्हा होणार, असाच सवाल केला जात आहे.
सध्या रेल्वेफाटक बंद केल्याने या मार्गावरून होणारा प्रवास करण्यासाठी लोकांना परीख पुलाखालून ये-जा करावी लागत आहे. तो गैरसोयीचा असल्यामुळे पादचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनामुळे रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला.
राजारामपुरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचाऱ्यांसाठी जवळचा आणि सोयीचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये - जा करत होते.
आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबुभाई परिख पूलांच्या खालून प्रवास करावा लागत आहे. हा पूल आधीच अरुंद आणि गलिच्छ आहे. त्यामध्ये आता वाहनधारकांसोबत पादचाऱ्यांनाही एकाच वेळी ये - जा करावी लागत असल्यामुळे वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.
रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचाऱ्यांना आता परीख पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेजचे पाणी पसरत असल्याने ते गलिच्छ पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधावा. तत्पूर्वी पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईनचे काम तत्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.