आता उसावर लष्करी अळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:04+5:302021-08-26T04:26:04+5:30

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने ...

Now the crisis of military larvae on sugarcane | आता उसावर लष्करी अळीचे संकट

आता उसावर लष्करी अळीचे संकट

Next

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जुलै महिन्यात महापुराने नदीबुड क्षेत्रातील ऊस पीक तब्बल १० ते १५ दिवस पाण्याखाली होते. यावर्षी ढगफुटीसदृश पावसाने जमिनीचे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले. याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाने जमिनीची धूप होऊन महापुराच्या पाण्यात जास्त रेताड पाणी आल्याने ऊस पिकावर मातीचा थर बसला आहे. यात ऊस पीक जमीनदोस्त झाले आहे. तर सुरळी वाळल्याने उसाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यातच नदीबुड क्षेत्रातील उसावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एका रात्रीत ही अळी शेकडो एकर क्षेत्रातील उसाच्या पिकावर हल्ला चढवत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या ऊस पिकाची हिरवी पानेही लष्करी अळी फस्त करत आहे. त्यामुळे पानांच्या शिरा फक्त शिल्लक राहत आहेत.

चौकट : महापुराच्या पाण्यात शेतीला विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर ९५ टक्के पुराच्या पाण्याखाली गेल्याने खराब झाले आहेत. विद्युत पोल कोसळले असून, वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपाची वीज खंडित झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या पावसाने दडी मारल्याने माळरानावरील आडसाली लागण, भुईमूग, पोटरीत आलेले भात व सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत.

चौकट : गवतावरही अळीचा प्रादुर्भाव

ऊस पिकाचा फडशा पाडल्यानंतर ही लष्करी अळी शेजारी असणाऱ्या गवतावर हल्ला चढवत आहे. त्यामुळे ओल्या वैरणीची टंचाई वाढली आहे.

Web Title: Now the crisis of military larvae on sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.