मोबाईलवर मिळणार आता पिकाचा अंदाज

By Admin | Published: May 28, 2017 01:17 AM2017-05-28T01:17:02+5:302017-05-28T01:17:02+5:30

शिवाजी विद्यापीठात ‘अ‍ॅप’ विकसित : बी.टेकच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार

Now, the crop estimate will be available on mobile | मोबाईलवर मिळणार आता पिकाचा अंदाज

मोबाईलवर मिळणार आता पिकाचा अंदाज

googlenewsNext

तानाजी पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय गाजत आहे. शेतातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे; पण भविष्यात कोणते पीक घ्यावयाचे याचा अंदाज आला तर शेतकऱ्यांचे भविष्यातील नुकसानही मोठ्या प्रमाणात टाळता येणे शक्य आहे. त्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत कोणते पीक घेता येईल हे शेतकऱ्यांना ठरविता येणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागल्याने त्यांची आर्थिक कचाट्यातून मुक्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचे लोण दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्यामुळे कर्जमुक्ती करा म्हणून अनेक नेत्यांचा नारा सुरू आहे; पण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पीक नुकसानीवर उपाययोजना काढल्यास कर्जमाफीची गरजच भासणार नाही, तसा प्रयत्न शिवाजी विद्यापीठातील ‘बी. टेक’च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ तयार करून अडचणीतील शेतकऱ्यांना एक दिलासा दिला जाणार आहे.
अ‍ॅपमुळे शेतकऱ्याला आपल्या परिसरातील लागवड केलेल्या विविध पिकांची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. मातीची गरज, लागवडीची प्रक्रिया, हवामानातील गरज, पिके, रोग व कीड, खते आणि कीटकनाशके याविषयी या अ‍ॅपद्वारे माहिती शेतकऱ्यांना देता येणे सोपे होणार आहे. विशिष्ट पिकांसाठी किती क्षेत्र लागवड करायचे हे तो शेतकरी ठरवू शकतो, या अ‍ॅपद्वारे पिकांचे नियोजन करता येते, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही.



बाजारपेठेची माहिती मिळणार
शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बाजारातील किमतीची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. अ‍ॅपवरील माहितीमुळे शेतकऱ्यांला पेरणी करणाऱ्या पिकांची निवड करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक नफा मिळेल, अशाप्रकारे शेतकऱ्यांना जीवनशैली सुधारण्यास मदत होईल. या ‘अ‍ॅप’वरील नकाशाच्या मदतीने शेतकऱ्याला आपले उत्पादन विक्रीसाठी नजीकची बाजारपेठ शोधण्यास मदत होणार आहे.
सरकारी योजनांचीही अद्ययावत माहिती
या अ‍ॅपद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे ध्येय, अद्ययावत माहिती पुरवून शेतीमालामध्ये पारदर्शकता वाढविता येते. कृषी संबंधित कोणतीही योजना सरकार सुरू करत असल्यास त्याची अद्यायावत माहिती या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्याला पुरवली जाणार आहे तसेच नवीन खते किंवा पीक रोगाबाबत माहिती पुरवली जाणार आहे.



शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने हे ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप येत्या पंधरा दिवसांत ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध होईल.
- प्रसन्न करमरकर, सहायक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग

‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’साठी या विद्यार्थ्यांचे योगदान
‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित करण्यासाठी सहायक प्राध्यापक प्रसन्न करमरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तर त्यासाठी शिवाजी विद्यापीठ ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विवेक कुरूवडे (रा. खांबित, ता. आस्ती, जि. वर्धा), कोमल हाबीवंत (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), श्रद्धा निंबाळकर (सातारा), शीतल कुलकर्णी (रा. हिंगणगड, ता. खानापूर, जि. सांगली), शहदमनी मोमीन (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Web Title: Now, the crop estimate will be available on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.