आता प्रकृतीची खातरजमा होणार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
By admin | Published: September 16, 2014 10:52 PM2014-09-16T22:52:06+5:302014-09-16T23:39:04+5:30
विधानसभा निवडणूक : सबब दिलेल्या कर्मचाऱ्यांची २० रोजी बैठक
सांगली : प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक कामकाजात सहभागी होता येत नसल्याचे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक येत्या २0 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कारणांची खातरजमा खुद्द जिल्हाधिकारीच करणार आहेत.
प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक कामकाज करण्यास असमर्थ असल्याची धारणा असणाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय मंडळाच्या प्रमाणपत्रासह येत्या २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. वैद्यकीय कारणामुळे निवडणूक काम करण्यास असमर्थ असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हाधिकारी कुशवाह स्वत: करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी मतदान केंद्रावर निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ते वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीचे कामकाज करण्यास असमर्थ असल्याची धारणा आहे, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय मंडळ यांचेकडील प्रमाणपत्र घेऊन दिनांक २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे पाहून त्यांच्या निवडणुकीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
बोगसगिरीला चाप!
निवडणूक काम टाळण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनेकदा बनाव केला जातो. त्यामुळेच आता आजारी असल्याचे किंवा औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्यामुळे यावेळी बोगस प्रमाणपत्रांना आळा बसण्याची शक्यता आहे.