आता लहान मुलांनाही मिळणार अंबाबाई, जोतिबा मंदिरात प्रवेश, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:18 PM2022-03-04T18:18:46+5:302022-03-04T18:19:24+5:30
काही दिवसांपूर्वी लहान मुलांना सोडण्यावरून नाशिकच्या भाविकांनी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर हात उगारला होता
कोल्हापूर : शासनाने गुरुवारी कोरोना निर्बंध शिथील केल्याने करवीर निवासिनी अंबाबाई व जोतिबा मंदिरात दहा वर्षाखालील लहान मुलांना शुक्रवारपासून मंदिरात सोडण्यास सुरूवात झाली. तासाला भाविकांची संख्यादेखील २ हजारांपर्यंत वाढवण्यात आली असून गरुड मंडपातून मुख दर्शनाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
गाभारा व मुखदर्शन या दोन्ही प्रकारच्या दर्शनासाठी ई पास काढणे बंधनकारक असेल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
राज्य शासनाने गुरुवारी कोरोना निर्बंध अधिक शिथील केले आहेत, त्यानुसार सर्व धार्मिक स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिरात लहान मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. अंबाबाई मंदिरात शुक्रवारपासूनच याची सुरूवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वी लहान मुलांना सोडण्यावरून नाशिकच्या भाविकांनी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर हात उगारला होता. लहान मुलांना मंदिरात प्रवेश मिळाल्याने भाविकांची फार मोठी अडचण दूर झाली आहे.