आता प्रत्येक घर ‘एलईडी’ बल्बने उजळणार

By admin | Published: January 22, 2016 01:03 AM2016-01-22T01:03:33+5:302016-01-22T01:03:44+5:30

कोल्हापूर-सांगलीत मोहीम : साधे बल्ब इतिहासजमा होणार; फेब्रुवारीअखेर ४७ लाख बल्बचे उद्दिष्ट

Now every house will light up the LED bulb | आता प्रत्येक घर ‘एलईडी’ बल्बने उजळणार

आता प्रत्येक घर ‘एलईडी’ बल्बने उजळणार

Next

विश्वास पाटील -- कोल्हापूर कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांच्या घरी साध्या व ‘सीएफएल’ऐवजी ‘एलईडी’ बल्ब बसविण्याची मोहीम येत्या चार दिवसांत सुरू होत असल्याची माहिती ‘महावितरण’ कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. कोल्हापूर व सांगलीत मिळून एकूण ११ लाख ८० हजार ७३२ घरगुती वीजग्राहक असून त्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत ४७ लाख २३ हजार इतक्या बल्बचे वाटप केले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘एक्झिक्युटिव्ह इफिन्शिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ (इइएसएल) या कंपनीकडून हे काम मुख्यत: होणार असून महावितरण कंपनीकडून त्यांना स्थानिक साहाय्य केले जाणार आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीजबचतीसाठी एलईडी बल्ब बसविण्याचा कार्यक्रम देशभर हाती घेतला आहे. ही पर्यावरणपूरक वीजबचत योजना आहे. त्यासाठी ग्राहकावर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. एका ग्राहकास सरासरी चार बल्ब देण्यात येतील. या बल्बसाठी कंपनीकडून तीन वर्षांची गॅरंटी असेल. पहिल्या टप्प्यात नागपूर अर्बन, भांडुप आणि कल्याण; दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीण, औरंगाबाद, अमरावती येथे ही मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, नाशिक, बारामती, कोकण, लातूर, नांदेड व जळगाव परिमंडळामध्ये ती सुरू होत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत हे बल्ब बसविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.


बल्ब घेण्यासाठी ग्राहकांनी काय करायचे...
चालू वीज बिलाची झेरॉक्स आणि पॅन कार्ड, वाहन परवाना असे कोणतेही छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक. विविध कंपन्यांच्या एलईडी बल्बची किंमत सरासरी ३०० रुपये आहे; परंतु केंद्र शासनाचे साहाय्य असल्याने हा बल्ब १०० रुपयांत दिला जाणार आहे. ज्यांना ही रक्कम एकदम भरून घेऊन बल्ब बसविणे शक्य नाही, त्यांना दरमहा दहा रुपये वीज बिलातून देता येतील.

कसा असेल हा बल्ब..
आता आपण वापरत असलेला साधा बल्ब हा सरासरी ४० ते ६० वॅट क्षमतेचा असतो. त्याची सरासरी किंमत २० रुपये आहे. सीएफएल बल्ब हा १४, १६ व २० व्हॅटचा असतो. त्याची किंमतही जास्त आहे. एलईडी बल्ब हा फक्त सात व्हॅटचा असेल; परंतु तरीही त्याचा प्रकाश हा साध्या ६० वॅटच्या बल्बइतका असेल.
या बल्बचा प्रकाश साध्या बल्बपेक्षा अधिक पांढराशुभ्र असेल. तो तापणार नाही. शिवाय पर्यावरणपूरकही असेल.
वीजवापर कमी, त्यामुळे बिलही कमी येईल.
या बल्बसाठी कंपनीचीच तीन वर्षांची गॅरंटी असेल.
बल्ब दुरुस्त करून देणे, बदलून देणे ही जबाबदारीही कंपनीचीच असेल.
हे बल्ब महावितरणचे सर्व उपविभाग, शाखा कार्यालये, बिलिंग केंद्रांवर उपलब्ध
असतील.

बल्ब बसविण्याचे काम फेब्रुवारीअखेर संपविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही ‘महावितरण’च्या मुख्यालयाशी संपर्कात आहोत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.
- शंकर शिंदे
मुख्य अभियंता, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

Web Title: Now every house will light up the LED bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.