मुंबईतील बैठकीकडे आता सर्वांच्या नजरा
By Admin | Published: August 28, 2016 12:43 AM2016-08-28T00:43:00+5:302016-08-28T00:43:00+5:30
दोन पर्याय सरकारसमोर
कोल्हापूर : हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले असताना आणि दोन्हीही गट आपल्या मागणीवर ठाम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून निर्णयाबाबत उत्कंठाही लागली आहे. दरम्यान, तांत्रिक कारण देत हद्दवाढीचा निर्णय प्रलंबित ठेवणे किंवा शहरालगतची आठ ते दहा गावे देऊन हद्दवाढ जाहीर करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासूनच सकारात्मक आहेत. वेळोवेळी त्यांनी शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच महानगरपालिकेकडून सुधारित प्रस्ताव मागविणे, दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीकडून अहवाल मागवून घेणे, हद्दवाढ समर्थक व विरोधक यांच्याशी चर्चा करणे आणि तज्ज्ञांशी व्यक्तीश: भेटून चर्चा करणे, आदी मुद्द्यांवरून मुख्यमंत्री व पालकमंत्री सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु तरीही सरकारने एकतर्फी निर्णय घेण्याचे टाळले आहे.
मुंबईत १ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीचा निर्णय कोणावर लादणार नाही, तो सर्वमताने घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. तेव्हापासून दोघांनीही आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक व आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हद्दवाढीच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एक-एक पाऊल मागे येऊन समजूतदारपणाने तडजोड स्वीकारावी, अशी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भूमिका आहे.
मुळात फडणवीस व पाटील हे दोघेही वादग्रस्त निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकमत करूनच निर्णय घ्यावा या विचारात आहेत. मंगळवारी मुंबईत पुन्हा दोन्ही गटांशी एकत्र चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे. त्यामागचा हेतूसुद्धा हाच आहे.
त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत निर्णय झालाच, तर एकमताने केला जाऊ शकतो.
अशी आहेत गावे...
१) सरनोबतवाडी २) मुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव ५) पाचगाव ६) मोरेवाडी ७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे ९) कळंबे तर्फ ठाणे
१०) उचगाव १२) वाडीपीर १३) वडणगे १४) शिये १५) शिंगणापूर
१६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर. शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसीचाही नव्या हद्दवाढीत समावेश व्हावा, असा महापालिकेचा आग्रह आहे.
मंगळवारी काय होऊ शकते?
मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत समर्थक आणि विरोधक यांना तडजोड स्वीकारण्याबाबत आग्रह धरला जाऊ शकतो.
करवीर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील गावे हद्दवाढीच्या प्रस्तावातून वगळून कोल्हापूर दक्षिणमधील गावांचा समावेश करून हद्दवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
साधारणपणे आठ ते दहा गावांचा त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. या गावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याची हमी राज्य सरकार देऊ शकते.
जर एकमत झालेच नाही, तर मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तांत्रिक कारण देत हा निर्णय प्रलंबित ठेवला जाऊ शकतो.