‘जोतिबा’ आराखड्याचे आता अंतिम सादरीकरण
By admin | Published: March 11, 2017 11:34 PM2017-03-11T23:34:44+5:302017-03-11T23:34:44+5:30
मुख्यमंत्र्यांबरोबर मंगळवारी बैठक : वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा
कोल्हापूर : जोतिबा परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या निधीच्या मान्यतेसाठी मंगळवारी (दि. १४) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आराखडा सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर जाताना आराखड्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेऊया, अशा सूचना दिल्या. सादरीकरणावेळी संबंधित विभागांनी काय करायचे, कोणते मुद्दे मांडायचे, यावर चर्चा झाली.
जोतिबा विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून, यावेळी हा आराखडा सादर केला जाणार आहे. त्यावेळी आराखड्यासंदर्भात नेमके काय सादरीकरण करायचे, कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जोतिबा परिसरासाठी १५५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील २५ कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील आराखडा राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करण्यात आला होता. या समितीने यामध्ये बदल सुचवून आणखी काही कामे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बैठकीत चर्चा झाली. आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे तो परिपूर्ण असावा, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची प्रत्येक विभागाने काळजी घेतली पाहिजे. त्यानुसार संबंधितांना सूचना देण्यात आल्या. सादरीकरण करताना कोणते मुद्दे मांडायचे, त्यातील कोणत्या ठळक मुद्द्यांवर भर द्यायचा, यावर चर्चा करण्यात आली. हा आराखडा तांत्रिकदृष्ट्या भक्कम करण्यात आला असून, त्याला अंतिम मान्यता मिळण्यास काहीच अडचण नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भूमिगत विद्युततारा, यात्री भवन समाविष्ट
मुख्य सचिवांच्या समितीने आराखड्यात बदल करून काही कामे नव्याने समाविष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी जोतिबाच्या सासनकाठीच्या मार्गावर असलेल्या विद्युततारांचा अडथळा असून त्यावर पर्याय काढण्याची सूचना केली होती.
त्या अनुषंगाने या विद्युततारा भूमिगत केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी यात्री भवन उभारण्यात येणार आहे. ही दोन कामे या आराखड्यात नव्याने समाविष्ट केली आहेत.