शेतकरी संघाकडे आता ठेवींचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:15+5:302021-08-19T04:29:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने केलेल्या आवाहनानुसार विविध संस्थांनी ठेवी ठेवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने केलेल्या आवाहनानुसार विविध संस्थांनी ठेवी ठेवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २६ लाखांच्या ठेवी संघाकडे जमा झाल्या आहेत.
शेतकरी संघाचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने प्रशासक आले. दोन सदस्यीय प्रशासक मंडळात अध्यक्ष म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, तर सदस्यपदी सहायक निबंधक प्रदीप मालगावे आहेत. प्रशासक मंडळ आल्यापासून संघातील कारभाराला चांगलाच चाप लागला असून, सर्व विभागांची झाडाझडती घेतली जात आहे. संघाचा कारभार गतिमान करण्यासाठी भांडवलाची गरज असून संलग्न संस्थांकडून ठेवी संकलित करण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकरी सहकारी संघ सेवक संस्थेकडून तब्बल २५ लाखांची ठेव देण्यात आली. ठेवीच्या रकमेचा धनादेश व ठरावाची प्रत संस्थेचे अध्यक्ष संजय निर्मळ, उपाध्यक्ष अख्तार अत्तार यांनी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमर शिंदे यांच्याकडे दिली. त्याचबरोबर गारगोटी येथील वेदगंगा सहकारी ग्राहक संस्थेने एक लाखाची मुदतबंद ठेव संघाकडे ठेवली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, प्रशासकीय मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, संघाचे प्रभारी व्यवस्थापक सचिन सरनोबत, कर्मचारी संघटनेचे सचिव दीपक निंबाळकर, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : गारगोटी येथील वेदगंगा ग्राहक संस्थेने शेतकरी संघाकडे एक लाखाची ठेव ठेवली. यावेळी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमर शिंदे, सर्जेराव मोरे, दीपक निंबाळकर, आदी उपस्थित होते. (फोटो-१८०८२०२१-कोल-शेतकरी संघ)