आता पुन्हा उडणार टोल‘धुमाळी’
By admin | Published: May 29, 2014 01:07 AM2014-05-29T01:07:35+5:302014-05-29T01:07:49+5:30
आयआरबी सज्ज : नऊही नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात; टोल न देण्यावर कृती समिती ठाम
कोल्हापूर : पोलिसांसाठी शेडची उभारणी, नादुरूस्त असलेले जनरेटर दुरूस्त करण्याची ‘आयआरबी’च्या कर्मचार्यांची लगबग आज, बुधवारी शाहू आणि सरनोबतवाडी टोलनाक्यांवर सुरू होती. या कामावेळी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. शाहू नाक्यावर नागरिकांकडून विचारपूस सरनोबतवाडी टोलनाक्यावर सकाळपासून पाच पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. या ठिकाणी आयआरबीची केबीनची साफसफाई आणि नादुरुस्त झालेल्या जनरेटरची दुरुस्ती करून कर्मचारी निघून गेले होते. शाहू नाक्यावर कर्मचार्यांकडून पोलिसांसाठीच्या शेडची उभारणी वेगाने सुरू होती. त्यासह केबीनची स्वच्छता केली जात होती. दरम्यान, टोलनाक्यावर सुरू असलेल्या संबंधित कर्मचार्यांची लगबग पाहून येथून जाणारे वाहनधारक ‘टोलवसुली सुरू झाली का?’ ‘कधी सुरू होणार आहे?’ अशी विचारणा केली जात होती. उचगाव टोलनाका येथे बंदोबस्तासाठी एकही पोलीस उपस्थित नव्हता. याचबरोबर या टोलनाक्यावर सर्वत्र शांतता होती. तर आयआरबीचे कर्मचारीही या ठिकाणी दिसत नव्हते. त्यामुळे या परिसरात वाहतूक सुरळीत चालू होती. शिये नाक्यावर पोलिसांसाठी शेड शिये टोलनाक्यावर सकाळपासून पोलीस बंदोबस्त दिसल्याने टोलवसुली पुन्हा सुरु होणार की काय? या विचाराने वाहनधारक हडबडलेले दिसले. कर्मचार्यांनी दिवसभरात पोलिसांना बसण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले तर इतर कर्मचारी नाक्याच्या परिसरात वावरत होते. सकाळी आठ वाजल्यापासून कळंबा टोलनाक्यावर एक पोलीस निरीक्षक, १ एलआयबी पेट्रोलिंग पथक पोलीस व सहा पोलीस कर्मचारी टोलनाक्याजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उभे होते. टोलनाक्यावरील केबीन पॉलिथीन पिशव्यात बंदिस्त होते. त्यामुळे टोलनाक्यापासून दूर पोलीस का उभे आहेत, याचे प्रवाशांत कुतूहल होते. पाच पोलीस कर्मचारी पुईखडी टोलनाक्याजवळ बंदोबस्तासाठी सकाळी आठ वाजल्यापासून उभे होते. दुपारी झाडाखाली उन्हात विश्रांती घेत होते, पण, हे सारं टोलवसुली बंदोबस्तासाठी आहे, याची पुसटशी कल्पना ना प्रवाशांना ना नागरिकांना, त्यामुळे सारे वातावरण नेहमीप्रमाणे शांत, टोलनाक्यावरील तीनही वसुली केबीन पॉलिथीन पिशवीत बंदिस्त केल्याने टोल सुरू होणार याची पुसटशी कल्पनाही कोणास नव्हती. शिरोली नाक्यावर साफसफाई ‘आयआरबी’चा मुख्य टोल नाका म्हणून शहरात प्रवेश करणार्या शिरोली नाका येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयआरबीचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता तर पाच पोलीस एका ठिकाणी उभे होते. वाहतूक सुरळीत चालू होती. तर टोल जमा करणार्या बूथना पिवळ्या प्लास्टिक कागदाने झाकले होते. त्याचबरोबर जनरेटर केबीन पाठीमागे किरकोळ दुरुस्ती काम करणारे काही कर्मचारी दिसत होते. पोलीस प्रशासनाने टोलवसुलीसाठी बंदोबस्त पुरविण्यासाठी घातलेल्या अटी आयआरबीने मान्य केल्यानंतर बुधवारी सकाळी ८.०० वाजता फुलेवाडी नाक्यावर पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला. फुलेवाडी नाक्यावर एक अधिकारी व तीन कर्मचारी नाक्याच्या बंदोबस्तासाठी दिवसभर उभे होते. पोलीस दिवसभर उन्हाचा त्रास वाचविण्यासाठी झाडाचा आश्रय घेऊन उभे होते. आयआरबीचे कर्मचारी मात्र नाक्यावर फिरकलेच नाहीत. नाक्याचे साहित्य पॉलिथीनमध्ये बांधले होते. ते तसेच होते. आर. के. नगर टोलनाक्यावरही पोलिस बंदोबस्त होता मात्र येथे आयआरबीचे कर्मचारी उपस्थित नसल्याने नाक्यावर शांतता होती.