आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती
By समीर देशपांडे | Published: September 9, 2023 12:35 PM2023-09-09T12:35:21+5:302023-09-09T12:36:07+5:30
पहिल्या टप्प्यात 'या' सरकारी रुग्णालयात सुविधा सुरू करणार
कोल्हापूर : अनेक सर्वसामान्य रुग्णांना किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. तो परवडत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान मुंबई, नागपूर, पुणे येथील सरकारी रुग्णालयात किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट सुविधा सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे सेवा रुग्णालयामध्ये कॅन्सर आणि होमिओपथी सेवा उद्घाटनावेळी ते बोलत होते.
या रुग्णालयात डॉ. सुरज पवार, डॉ. रेश्मा पवार यांच्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने कॅन्सर रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. होमिओपॅथी तपासणी सुरू करणारे कोल्हापूर येथील सीपीआर हे राज्यातील पहिले हॉस्पिटल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. शिशिर मुरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.