बिनविरोधसाठी आता नेत्यांना साकडे
By admin | Published: April 6, 2017 12:57 AM2017-04-06T00:57:13+5:302017-04-06T00:57:13+5:30
भोगावती कारखाना निवडणूक : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्णय
भोगावती/आमजाई व्हरवडे : भोगावती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मॅरेथॉन चर्चा करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि जनार्दन पाटील यांच्या निमंत्रणानुसार बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेली चर्चा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांच्या कानावर घालून चर्चा करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आज, गुरुवारी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना प्रत्यक्षात भेटून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी साकडे घातले जाणार आहे, अशीही माहिती मिळाली आहे.
भोगावती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. ही गोष्ट स्वप्नवत वाटत असली तरी या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसंदर्भात यापूर्वी फक्तराजकीय अफवा पसरविल्या जात होत्या, कोणी नेता अगर कोणी कार्यकर्ता याबाबत एकमेकांच्या संपर्कात नव्हते. मात्र, आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी संघटनेने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शे.का.पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्यासह माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांना निमंत्रण देऊन चर्चा घडवून आणली आहे. ‘भोगावती’ची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे या घटकेला कारखाना वाचवणे हा एकच हेतू सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला सामोरे जावू ही भावना स्वाभिमानीने पटवून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे. स्वाभिमानी एवढ्यावर न थांबता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके, माजी आ. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, माजी आ. संपतराव पाटील, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्याबरोबर चर्चा करून साकडे घातले जाणार आहे.
या बैठकीत काँग्रेसच्यावतीने ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, उदयसिंह पाटील-कौलवकर, ए. डी. चौगले, शिवाजी पाटील, एम. आर. पाटील, राष्ट्रवादीच्या वतीने तालुका अध्यक्ष किसन चौगले, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, शे.का.प.च्यावतीने अशोक पाटील, केरबा भाऊ पाटील, शिवसेनेच्या वतीने बबन पाटील, भाजपच्यावतीने तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, डॉ. सुभाष जाधव यांनी भाग घेतला
‘स्वाभिमानी’चा पुढाकार
‘स्वाभिमानी’ने यापूर्वी भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते. आता तर ‘भोगावती’च्या निवडणुकीला हात घातला आहे.
‘भोगावती’ची परिस्थिती नाजूक
‘भोगावती’ची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने येथील सभासद हताश झाला आहे. निवडणुकीसाठी पन्नास लाख खर्च करण्याचीही ऐपत आज ‘भोगावती’ची नाही. त्यामुळे हा कारखाना वाचायचा असेल तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सभासदांची इच्छा आहे. मात्र, यासाठी नेत्यांनी मोठेपण दाखविण्याची गरज आहे.
इच्छुक उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
राशिवडे : राशिवडे गटातून तानाजी ढोकरे यांना भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी भोगावती परिसरातील हजारो कार्यकर्त्यांसह मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राशिवडे, भोगावती, घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे, आवळी, आणाजे, खिंडीव्हरवडे मार्गे मोटारसायकल रॅली राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गावी नेण्यात आली.
यावेळी ए. वाय. पाटील यांची भेट घेऊन राशिवडे गटातून तानाजी ढोकरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ढोकरे समर्थकांनी केली आहे. त्यानंतर ही रॅली भोगावती परिसरातील तारळे, शिरगाव मार्गे राशिवडे येथे आली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, यशवंत सेवा संस्थेचे संस्थापक विनायक पाटील, भारत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रणदिवे, माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव चांदणे, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रकाश धुंदरे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पी. आर. पाटील, कृष्णात परीट, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.