मुश्रीफांच्या राजकारणाला आता उतरती कळा
By admin | Published: February 1, 2017 11:58 PM2017-02-01T23:58:36+5:302017-02-01T23:58:36+5:30
संजय मंडलिक : मंडलिक यांच्या बळावर मोठे होऊनही अखेरच्या क्षणी मुश्रीफांनी त्यांना एकाकी पाडले
म्हाकवे : दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या बळावर मोठे होऊनही अखेरच्या क्षणी मुश्रीफांनी त्यांना एकाकी पाडले होते. चोहोबाजूंनी अडचणीत सापडलेल्या मुश्रीफांची आता राजकीय उतरण सुरू झाल्याचा पलटवार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केला. म्हाकवे (ता. कागल) यासह परिसरातील आणुरे, बानगे, मळगे, भडगाव परिसरातील कार्यकर्त्यांचा संपर्क दौरा केला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, अंमरिश घाटगे, सदासाखरचे संचालक बंडोपंत चौगुले, ए. वाय. पाटील - म्हाकवेकर, विलास पाटील, ए. टी. पाटील, एकनाथ पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी संजय घाटगे म्हणाले, ३५ वर्षे सत्ता आम्हाला दिली आता पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या, विकास काय असतो हे दाखवून देऊ, अशा वल्गना समरजितसिंह करीत आहेत. परंतु, ‘शाहू’ची सत्ता तुमच्याकडे ४० वर्षे आहे. आता कारखान्याच्या यंत्रणेचा वापर राजकारणासाठी होऊ लागल्याने राजकारणविरहीत कारभार करून कारखान्याचा आलेख वाढविण्यासाठी या कारखान्याची सत्ता पाच वर्षांसाठी आमच्याकडे द्या, असे आम्ही म्हटले तर चालेल काय?
शिक्षक नेते विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. डी. चौगुले, सिद्राम गंगाधरे यांनी मनोगत व्यक्त केले. आर. एस. पाटील, बाळासो रोड्डे, आकाराम पाटील, अशोक चौगुले, दिनेश पाटील, डॉ. विजय चौगुले, गजानन चौगुले, रामचंद्र चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
बेजबाबदार वक्तव्य थांबवावीत : घाटगे
संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीबाबत समरजितसिंह घाटगे यांनी बेजबादार आणि निराधार वक्तव्य करू नयेत. अपात्र लाभार्थी हे या कमिटीने केलेले नाहीत, तर ते कमिटीची स्थापना होण्यापूर्वीच राधानगरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी करून त्यांना अपात्र ठरविले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विश्वासाला पात्र राहून या कमिटीचे काम सर्व पक्षीय आणि लोकोपयोगी असे सुरू असल्याचा निर्वाळा संजय घाटगे यांनी करताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
म्हाकवे (ता. कागल) येथील संपर्क दौऱ्यावेळी प्रा. संजय मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, विलास पाटील, बंडोपंत चौगुले, ए. वाय. पाटील, एकनाथ पाटील, ए. टी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.