आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:09+5:302021-08-18T04:29:09+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून तोट्यात असलेल्या मंगल कार्यालय, लॉनचालक व विवाह सोहळ्यांवर अवलंबून असलेल्या बँडवाले, सजावट, आचारी ...
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून तोट्यात असलेल्या मंगल कार्यालय, लॉनचालक व विवाह सोहळ्यांवर अवलंबून असलेल्या बँडवाले, सजावट, आचारी सर्व घटकांना आता अच्छे दिन येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आता विवाहाला २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिल्याने पुन्हा लग्नाचा बार धूमधडाक्यात उडणार आहे.
लग्नाचा धूमधडाका म्हणजे अमाप उत्साह, पाहुण्यांची गर्दी, सरबराई, मानपान पण कोरोनाने सगळे निकष बदलले आणि शेकडो माणसांमध्ये होणारी लग्नं २५ माणसांवर आली. त्यामुळे लोकांनी लग्नावर पैसा खर्च करणे कमी केले. दारात लग्न उरकू लागली. पण यामुळे अशा कार्यक्रमांवर अवलंबून असणारे हार, फूल, गजरेवाले, आचारी, वाढपी, सजावट, बँड अशा सगळ्यांवर संक्रांत आली. पण आता पुन्हा शासनाने २०० माणसांपर्यंत सूट दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर यायला मदत मिळणार आहे.
---
लग्न समारंभासाठी या आहेत अटी
-खुल्या जागेत, लॉनच्या ५० टक्के, मात्र जास्तीत जास्त २०० व्यक्तींची उपस्थिती.
-बंदिस्त मंगल कार्यालये, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमता किंवा जास्तीत-जास्त १०० व्यक्तींची उपस्थिती.
- कार्यालय, लॉन, हॉटेल व्यवस्थापन, जेवण, बँडपथक, भटजी, छायाचित्रकार अशा विवाह सोहळ्यांशी संबंधित लोकांचे लसीचे दोन्ही डोस झाल्यानंतर पुढे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे बंधनकारक. ओळखपत्र व लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक.
--
लग्नाच्या तारखा
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विवाह मुहूर्त नाहीत. अशा गौण काळातील विवाह मुहूर्त
ऑगस्ट : १८, २०, २१, २५, २६,२७, ३०, ३१.
सप्टेंबर : १, ८, १६, १७
ऑक्टोबर : ८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०
नाेव्हेंबर महिन्यापासून विवाह मुहूर्त सुरू होत आहेत. या तारखापुढीप्रमाणे
नोव्हेंबर ८,९,१०,१२,१६ , २०,२१,२९,३०.
डिसेंबर : १,७,८,९,१३,१९,२४,२६,२७,२८,२९.
---
मंगल कार्यालयांमध्ये उत्साह
कोरोनामुळे गेली दीड वर्षे कार्यालयांचा व्यवसायच झालेला नाही. २५-५० माणसात होणारे लग्न आणि २०० लोकांमध्ये होणाऱ्या लग्नांमध्ये फरक पडतोच. जास्त माणसं येणार असली, तर खर्च करायची तयारी असते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सागर चव्हाण
अध्यक्ष, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन
--
घरातली माणसंच २५ होतात, अशा विवाह सोहळ्यांमध्ये मजा नाही येत. आता जास्त माणसांना परवानगी मिळाल्याने लोकांना आणि आम्हालाही व्यवसायाच्या दृष्टीने सगळं सोयीस्कर आहे.
शरद नागवेकर (शिवाजी मंदिर)
--
बॅण्डवालेही जोरात
कोणताही कार्यक्रम किंवा विवाह सोहळे बँडपथकाशिवाय पूर्ण होत नाही; पण गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आमचा व्यवसाय पार थंडावला आहे. इतर व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. आता जास्त लोकांची परवानगी मिळाल्याने आम्हालाही चांगली सुपारी मिळेल.
प्रशांत कुरणे (बँड व्यावसायिक)
-