आता पुढची ‘झेप’ स्थानिक निवडणुकांत
By admin | Published: May 26, 2015 12:23 AM2015-05-26T00:23:41+5:302015-05-26T00:48:49+5:30
भाजपचे अधिवेशन : कोल्हापूर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष्य
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषदेसाठी कोल्हापूर शहर निवडून साखरपट्ट्यात मुसंडी मारण्याची तयारी केली आहे. ही परिषद यशस्वी झाल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यातून त्यांना ऊर्जा मिळाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला विशेष महत्त्व आहे.
केंद्र व राज्यातील पक्षाच्या यशानंतर पहिली प्रदेश कार्यकारिणीची बैठक थेट पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात घेऊन भाजपने सहकार पट्ट्यात शिरकाव करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तीन दिवसांत पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षावर जनतेने टाकलेला विश्वास, पक्षाची झालेली अभूतपूर्व सदस्य नोंदणी, भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने केलेली जनताभिमुख कामे व विविध निर्णय तळागाळांत पोहोचविण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आदी विषयांवर ऊहापोह करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते रिचार्ज झालेच त्याचबरोबर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकांसाठी त्याचा कितपत लाभ उठविता येईल हे पाहावे लागणार आहे. शहरी भागात पक्षासाठी चांगले आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु ग्रामीण भागात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरात अलहिदा पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँक यासह गावपातळीवरील सेवा संस्था, दूध संस्थांच्या माध्यमातून असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील प्रभाव नाकारून चालणार नाही. तो पक्षासाठी निश्चित आव्हानात्मक असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना चांगलाच कस लागणार आहे.
त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारने एक वर्षभरात केलेली कामे व राज्यातील फडणवीस यांच्या सरकारने सहा महिन्यांत केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा शिवधनुष्यही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिला आहे. प्रत्येक घराघरांत हे काम पोहोचविताना चांगलीच दमछाक होणार आहे. कारण भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचे जाळे कमी आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख सभासद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘सशक्त भारत’ करण्यासाठी सदस्यता नोंदणीत भाजप हा जगातील एक क्रमांकाचा पक्ष झाला आहे. राज्यातही १ कोटी नोंदणी व जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख सभासद झाले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचून पक्ष धोरण व सरकारचे काम सांगण्याचे जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे.
शिवसेनेला डिवचण्याचे कारण काय?
एका बाजूला मुंबई महापालिकेसह सर्वच
ठिकाणी शिवसेनेबरोबर युती करण्याची
भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेला डिवचले आहे. त्यामागे नेमके कारण काय? असा
प्रश्न उपस्थित होत आहे.