काँग्रेसची मदार आता शिवसेनेच्या भूमिकेवर
By admin | Published: March 5, 2017 12:13 AM2017-03-05T00:13:16+5:302017-03-05T00:13:16+5:30
जिल्हा परिषद सत्तेचे राजकारण : ‘युवक क्रांती’चे सदस्य सहलीवर
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने सावध मोर्चेबांधणी केली असली, तरी युवक क्रांतीच्या दोन सदस्यांना भाजप नेत्यांनी सहलीवर पाठविल्याने दोन्ही कॉँग्रेससमोर पेच निर्माण होऊ शकतो. दोन्ही कॉँग्रेसची सत्तेची मदार आता केवळ आणि केवळ शिवसेनेच्या भूमिकेवर राहणार आहे.
जिल्हा परिषदेचा निकाल लागून दहा दिवस झाले आहेत, पण सत्तेचा लंबक रोज इकडून तिकडे झुकत असल्याने सत्तेबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. निकालाच्या दिवसापासून कॉँग्रेसने सत्तेसाठी सर्व फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने भाजपनेही महापालिकेतील अनुभव उराशी बांधून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सत्ता आमचीच येणार असे जरी सांगत असले, तरी त्यांना सत्तेची मॅजिक फिगर ‘३४’पर्यंत पोहोचता आलेले नाही. दोन्ही काँग्रेसचे २५ सदस्य आहेत. प्रकाश आवाडे यांच्या गटाचे दोन सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या ‘शाहू आघाडी’चे दोन व अपक्ष रसिका अमृत पाटील असे सात सदस्य आपल्या बाजूने असल्याचा दावा कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे; पण यापैकी कोणीही उघडपणे पाठिंबा जाहीर केलेला नाही. या सगळ्यांनी पाठिंबा दिला तरी दोन सदस्य कमी पडतात. चंदगडच्या युवक क्रांतीचे दोन सदस्य आपल्याबरोबर राहतील, असे दोन्ही कॉँग्रेसला वाटत होते. या सदस्यांचा निर्णय डॉ. नंदिनी बाभूळकर व गोपाळराव पाटील घेणार असले, तरी तोपर्यंत कोणतीही जोखीम नको म्हणून सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. युवक क्रांती भाजपसोबत राहिली तर ‘भाजता’चे संख्याबळ २५ पर्यंत पोहोचते. सत्तेसाठी दोन्ही कॉँग्रेसला दोन, तर ‘भाजता’ला दहा सदस्य कमी पडतात. हे दहा सदस्य शिवसेनेचे आहेत. मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्षात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काहीशी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तेथील सत्तेचा तिढा सुटण्याची आशा भाजप नेत्यांना आहे. तिथे शिवसेना-भाजप एकत्र आली तर कोल्हापुरात एकत्र येण्यास काही हरकत राहणार नाही.
निकालाच्या दिवसापासून कॉँग्रेसने सत्तेसाठी सर्व फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
दुसऱ्या बाजूने भाजपनेही महापालिकेतील अनुभव उराशी बांधून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत.