अंगणवाड्यांना आता कच्चे धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:44 AM2019-07-01T00:44:22+5:302019-07-01T00:44:27+5:30
नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अंगणवाड्यांतून लहान बालके, गरोदर, स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार बदलण्यात ...
नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंगणवाड्यांतून लहान बालके, गरोदर, स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार बदलण्यात आला आहे. टीएचआर अर्थात तयार आहाराऐवजी कच्चे धान्य मिळू लागले आहे. त्यात गहू, मूगडाळ, चवळी, मटकी, मसूरडाळ, तेल, तिखट पूड, हळद, मीठ यांचा समावेश आहे. वयोगट व पोषण मानांकनानुसार त्याचे प्रमाण ठरविण्यात आले आहे.
टीएचआरच्या ठेक्यावरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास विभागाने आहारासंदर्भात नवीन टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने लाभार्थ्यांना टीएचआर वगळून अन्य आहार पुरवण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. त्यानुसार महिला व बालकल्याण मंत्रालयाने जीआर काढून राज्यातील १८ विभागांत तयार आहाराऐवजी कच्चे धान्य वाटपाची तात्पुरती व्यवस्था सुरू केली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे.
टीएचआरमध्ये सुजी, उप्पीट, शिरा, शेवया असे पदार्थ तयार करता येतील, असे पाकीट दिले जात होते. या पाकिटातील आट्यापासून वरीलप्रमाणे पदार्थ करून अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची बालके, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना त्याचे वाटप केले जात होते. यात पोषणमूल्ये मिळावीत, ही अपेक्षा होती; तथापि या पदार्थांना चव नसल्याने अनेकजण तो स्वीकारत नसत. सक्ती केली जात असल्याने जनावरांना भुसा म्हणूनच त्याचा वापर केला जात होता. याविरोधात सातत्याने विरोध झाला. हा आहार बंद करावा, असा ठरावदेखील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये झाला होता; पण हा राज्यस्तरीय ठेका असल्याने काही करता येत नसल्याची सबब सांगत ठेकेदाराला दरवर्षी कोट्यवधीची बिले दिली जात होती. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयातच तक्रार गेल्यानंतर झालेल्या सुनावणीत आहाराविषयी चिंता व्यक्त करतानाच ठेकेदार सांभाळण्याच्या प्रवृत्तीवर गंभीर ताशेरे ओढले गेले होते. यानंतर हा आहार बदलण्याचा निर्णय घेतला.
वाटपात तफावत
कच्चे धान्य सेविका व मदतनिसांकडे पोहोच झाले आहे. प्रत्यक्षात वाटप करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात. महिलांनी वाद घातल्यानंतर थोडेच धान्य दिले जात आहे. आलेले धान्य आणि वाटप यात तफावत दिसत आहे.
दोन महिन्यांसाठीचे धान्य
धान्य बालके गरोदर व स्तनदा माता
गहू २८00 ते ३१00 ग्रॅम ३३00 ग्रॅम ते ४२५0 ग्रॅम
मसूरडाळ १५00 ते १३00 ग्रॅम १९00 ते १६५0 ग्रॅम
मिरची २00 ग्रॅम २00 ग्रॅम
हळदी २00 ग्रॅम २00 ग्रॅम
मीठ ४00 ग्रॅम ४00 ग्रॅम
सोयाबीन तेल ५00 ग्रॅम ५00 ग्रॅम
चवळी १५00 ते १३00 ग्रॅम २000 ते १६५0 ग्रॅम