आता दोन लाखांची जोखीम
By admin | Published: March 20, 2017 12:56 AM2017-03-20T00:56:57+5:302017-03-20T00:56:57+5:30
‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ : तब्बल ११०० आजारांचा समावेश
गणेश शिंदे -- कोल्हापूर---राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे लवकरच ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य’ असे नामकरण होणार असून, या नवीन योजनेत राज्य सरकार दोन लाखांपर्यंतची जोखीम घेणार आहे. या नवीन योजनेत तब्बल ११०० आजारांचा समावेश केला असून, तालुकास्तरावरील खासगी रुग्णालयांनाही यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात घसघशीत १३१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
तत्कालीन काँग्रेस आघाडी राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्णांत ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्णात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू झाली. या योजनेत सध्या जिल्ह्णातील ३२ रुग्णालयांचा समावेश आहे. त्यासाठी ३० बेड व अतिदक्षता विभागाचा निकष आहे. राज्य सरकार पूर्वी या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये साडेआठशे कोटी रुपयांची तरतूद करीत होेते. मात्र, आता ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य’ या नवीन योजनेत ती वाढविण्यात आली. ती ४६६ कोटी रुपयांनी वाढविली आहे. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
सध्याच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत एका रेशनकार्डधारकामागे नॅशनल इन्श्युरन्स कंपनीला ३३३ रुपये मिळत आहेत. तसेच ९७१ आजार व दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण पॅकेज, किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपये व काही आजारांचे पॅकेजीस कमी आहेत. दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारने या राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. मात्र, प्रीमियम कंपनीचा करार, विमा हप्त्याचा गोंधळ अशा विविध तांत्रिक कारणांमुळे हे नामकरण लांबणीवर पडले. साधारणत: आता तीन-चार महिन्यांत नवीन योजना कार्यान्वित होणार असून, तिचा लाभ रुग्णांना होणार आहे.
ही योजना खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या दृष्टीने आधारवड ठरत असल्याने सरकारनेही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १३१६ कोटींची तरतूद करून योजना अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.
- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.
तात्पुरती मुदतवाढ...
विमा कंपनीला पूर्वी प्रत्येक रेशनकार्डधारकामागे सरकारकडून ३३३ रुपये मिळत होते. पण, २० नोव्हेंबर २०१६ रोजी विमा कंपनीचा करार संपला आहे.
त्यामुळे सरकारने या विमा कंपनीला तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. या कंपनीला आता ३३३ रुपयांवरून ५०१ रुपये मिळत आहेत.
नवीन योजना झाल्यास हे फायदे मिळणार...
दीड लाखाचे विमा संरक्षण दोन लाखांवर
किडनी प्रत्यारोपणाचे पॅकेज अडीच लाखांऐवजी साडेतीन लाख रुपये
९७१ आजारांची संख्या वाढवून ती ११०० होणार